हरवलेल्या मुख्यमंत्र्यांना शोधा, संभाजी ब्रिगेडचे पोलिसांना निवेदन
जिह्यात 32 शेतकऱ्यांचा फवारणीमुळे मृत्यू होऊनही मुख्यमंत्री गायब
गिरीश कुबडे, वणी: गेल्या काही दिवसांपासून रासायनिक किटकनाशकांचा फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात ३२ शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला. एवढी गंभीर घटना घडूनही मुख्यमंत्र्यांनी अद्याप मृत झालेल्या शेतकरी कुटुंबियांची साधी भेटही घेतली नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्री गायब झाले असून त्यांना लवकरात लवकर शोधून काढा असं आवाहन पोलीस महासंचालकांना निवेदनातून केले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर यांना फवारणीतून विषबाधा होत आहे. यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची देशभरात चर्चा आहे. या संपूर्ण घटनेने प्रशासन हादरून गेले आहे. मात्र मुख्यमंत्री विदर्भाचे असूनही त्यांनी अद्याप एकाही मृत शेतकऱ्यांची कुटुंबीयांची भेट घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना शोधून काढण्याचं आवाहन करत पोलिस निरीक्षक, वणी यांचे मार्फत निवेदन दिले आहे. या वेळी अजय धोबे, दत्ता डोहे, प्रवीण खानझोडे, अमोल टोंगे, अखिल सातोरकर आणि मोठ्या प्रमाणात ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.