फरार रंगाच्या मध्यप्रदेशातून आवळल्या मुसक्या

3 दिवसांचा पीसीआर, समीर उर्फ रंगाच्या रंगदारीला लगाम

विवेक तोटेवार, वणी: 11 ऑक्टोबर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास माळीपूरा स्थित पंकज भंडारी यांचे दुकान जेसीबीने समीर रंगरेज यांनी पाडले होते. यात भंडारी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. घटनेनंतर मुख्य आरोपी समीर रंगरेज हा फरार झाला होता. तेव्हापासून वणी पोलीस आरोपीच्या मागावर होते. अखेर शुक्रवारी रात्री वणी पोलिसांच्या पथकाने मध्यप्रदेश येथील छिंदवाडा येथून आरोपीला अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 16 ऑक्टोबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी दोन दिवस आधीच जेसीबी चालक व वाहक याला अटक करण्यात आली होती.

माळीपूरा येथे पंकज भंडारी यांचे फर्निचरचे दुकान आहे. सदर जागा ही समीर रंगरेज यांनी विकत घेतली असून जागा खाली करण्यावरून समीर रंगरेच व दुकान चालक भंडारी यांच्यात वाद होता. सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ट होते. मात्र न्यायालयाचा निकाल येण्याआधीच समीर याने कुठलीही नोटीस न देता परस्पर जेसीबीने दुकान तोडले. यामध्ये दुकानाचे जवळपास 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा भंडारी यांनी केला होता.

या प्रकरणी वणी पोलिसात कलम 457, 380, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तात्काळ जेसीबीचा चालक विनोद सुधाकर अवताडे व वाहक रुपेश उद्धव आत्राम यांना अटक केली होती. परंतु मुख्य आरोपी मात्र अजूनही फरार होता. पोलिसांनी तांत्रिक सूत्र हलवली व आरोपीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या मोबाईल लोकेशन वरून त्याचा सुगावा लागला. शुक्रवारी रात्री मध्यप्रदेश मधील छिंदवाडा येथून समीर रंगरेज, जावेद रंगरेज, सोनू रंगरेज अशा तीन आरोपींना अटक करून वणीत आणले.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी सुदाम असोरे, जमादार विकास धडसे, पो. कॉ. शुभम सोनूले, सागर सिडाम, मोहमद वसीम यांनी केली.

समीर उर्फ रंगाची रंगदारी
या प्रकरणी वणीतील व्यापाऱ्यांमध्ये  संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती. समीर उर्फ रंगा याच्यावर रेती तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहे. यातून कमावलेल्या मायेतून त्याची शहरात चांगलीच रंगदारी सुरू होती. त्याच अहंकारातून त्याने कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवत रात्री दुकान तोडले. शिवाय सकाळी सकाळी पोलीस स्टेशनला जाऊन याची लेखी कबुलीही दिली. रंगाच्या या दादागिरी विरोधात व्यापारी वर्ग, राजकीय क्षेत्र यासह विविध स्तरातून दबाव आला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.