अहेरी (बोरगाव) घाटावर महसूलची धाड, रेतीचोरीचा पर्दाफाश

अखेर प्रशासनाची कारवाई, तीन ट्रक जप्त

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व अवैधरित्या उपसा होत असल्याचा आरोप सातत्याने सुरु होता. अखेर यावर प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्री (शुक्रवारी) अहेरी (बोरगाव) घाटावर धाड टाकून तीन हायवा ट्रक जप्त केले. महसूल पथकाने धाड टाकताच दोन ट्रक चालकांनी ट्रकमध्ये भरलेली रेती तिथेच खाली केली. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी रेती भरलेला एक व दोन रिकामे ट्रक जप्त केले.

सध्या तालुक्यातील सर्व रेती घाट बंद आहे. काही घाटांवरून मध्यरात्री रेती तस्करी सुरू असल्याचा सातत्याने आरोप होत आहे. याबाबत अनेकांनी निवेदन देऊन प्रशासनाकडे कारवाईची मागणी देखील केली होती. मात्र प्रशासनाने कोणतीही तस्करी होत नाही असा दावा केला होता. मात्र शुक्रवारी प्रशासनाचा हा दावा फोल ठरला.

सध्या तालुक्यात रेती तस्करी रोखण्यासाठी महसूल विभागाने दोन पथके स्थापन केली आहेत. गुरूवारी रात्री पेट्रोलिंग करताना महसूल पथकाला अहेरी (बोरगाव) रेती घाटावर अवैधरीत्या रेती उपसा होत असल्याची माहिती मिळाली. रेती उपशाबाबत मंडळ अधिकारी देशपांडे यांनी तत्काळ नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार यांना माहिती दिली. त्यावरून नायब तहसीलदारांनी पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेत मध्यरात्री दीड वाजता अहेरी (बोरगाव) रेती घाटावर धाड टाकली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी महसूल अधिकाऱ्यांना रेती घाटावर हायवा ट्रक क्रमांक (एमएच ४०, बीजी ०१९८) मध्ये तब्बल नऊ ब्रास रेती भरलेली आढळली. तर (एमएच ४०, सीटी ३७४२) आणि (एमएच ३४, बीजी ९०६४) क्रमांकाच्या ट्रक चालकांनी धाड पडताच ट्रकमध्ये भरलेली रेती जागेवरच खाली केली. महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून तीनही ट्रक तहसील कार्यालय परिसरात लावले.

ही कारवाई उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार निखिल धुळधर यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार, मंडळ अधिकारी देशपांडे, तलाठी पाचभाई, मोहितकर, इंगोले, गोहणे यांनी केली.

Comments are closed.