सुशील ओझा, झरी: पैनगंगा नदीपात्रासह हर्रास न झालेल्या रेतीघाटातून खुलेआम रेती तस्करी करणा-या 70 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. यात अवैधपणे रेतीची वाहतूक करणारे ३५ ट्रॅक्टर जप्त केले असून, एका कंपनीकडून १ लाख रुपये दंड वसूल केला आहे. नव्याने रूजू झालेले तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी तीन महिन्यांत ही कार्यवाही केली आहे. या कारवाईने रेती तस्कराचे धाबे दणाणले आहे.
तालुक्यातील हिरापूर (मांगली) वगळता एकाही रेतीघाटाचा हर्रास झाला नाही. रेती तस्करांनी या संधीचा फायदा घेत इतर रेतीघाटासह पैनगंगा नदीच्या पात्रातून खुलेआम रेतीचा उपसा सुरू केला आहे. हिरापूर, परसोडा, दुर्भा, मुंजाळा, येडसी, कोसारा, पैनगंगा नदीतून दिवसरात्र ट्रॅक्टर व ट्रक द्वारे रेती चोरट्या मार्गाने नेत असल्याचे दिसून येते. मुकुटबन, अडेगाव, मांगली, कोसारा, दुर्भा, झरी, अर्धवन, पांढरकवडा(ल) या गावातील २५ ते ३० ट्रॅक्टर चालक-मालक तस्करी करण्यात अग्रेसर आहे.
बहुतांश ट्रॅक्टरमालक राजकीय पुढारी असून कारवाई करण्याकरिता आलेल्या तलाठी, मंडळ अधिकारी यांना धमकी देत असल्याचे बोलले जाते. तर काही कर्मचारी अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत हातमिळवणी केल्याची चर्चा महसूल विभागात आहे. त्यामुळे तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. परंतु नव्याने रुजू झालेले तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी राजकीय पुढाऱ्यांच्या धमक्यांना न जुमानता धाडसत्र राबवून कारवाईचा फास आवळला.
गत साडे तीन महिन्यांत ३२ ट्रॅक्टरवर कार्यवाही करून ६४ ट्रॅक्टर मालक चालकांवर चोरीचे गुन्हे दाखल केले. सर्व ट्रॅक्टर पोलीस स्टेशन ला जमा केले. तर औदार्य कंस्ट्रक्शन कंपनीच्या मुरूम भरलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई करून १ लाख ५ हजार दंड वसूल केला. .
या कार्यवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. ही कामगिरी तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांच्या मार्गदर्शनात महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलीसांनी केली..