बहुगुणी डेस्क, वणी: रेतीची अवैध रित्या वाहतूक करताना दोन ट्रॅक्टरला वणी पोलिसांनी पकडले. रविवारी दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास गोडगाव येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोन ब्रास रेती व दोन ट्रॅक्टर असा 8 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसडीपीओ पथकाने ही कारवाई केली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.
प्राप्त माहिती नुसार, एसडीपीओचे पथक गोडगाव (ईजासन) या परिसरात कामानिमित्त गेले होते. दरम्यान पथकाला वार्ड क्रमांक 3 सुकणेगाव रोडवर दोन ट्रॅक्टर एकामागून येत येताना दिसले. या दोन्ही ट्रॅक्टरमध्ये रेती भरून होती. पथकाला संशय आल्याने त्यांनी ट्रॅक्टर थांबवत चालकाला रेतीच्या रॉयल्टीबाबत विचारणा केली. मात्र दोन्ही चालकांकडे रेती वाहतुकीचा परवाना नव्हता. रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे लक्षात आल्यावर पथकाने दोन्ही ट्रॅक्टर (MH295814) (MH29BV2920) जप्त केले. घटनेचा पंचनामा केला.
या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टरमधून प्रत्येकी 1 ब्रास रेती ( किंमत 6 हजार रु. ), दोन ट्रॅक्टर व ट्रॉली ज्याची किंमत 8 लाख असा एकूण 8 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक अतुल माणिक बलकी (32) रा. गोडगाव व ट्रॅक्टर चालक कपिल बालाजी कुत्तरमारे (37) रा. परसोडा या दोघांविरोधात बीएनएसच्या कलम 303 (2) व महाराष्ट्र जमिन महसूल कायद्याच्या कलम 48 (8) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई हेड कॉन्स्टेबल विजय वानखडे, संतोष आढाव, संतोष कालवेलवार, अशोक दरेकार उपविभागीय अधिकारी पथक वणी यांनी पार पाडली. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.