शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय आवारी यांचा राजीनामा

राजीनाम्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ, राजीनामा की 'नाराजी'नामा?

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय आवारी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपुर्द केला. कौटुंबिक कारणांमुळे आपण हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र मारेगाव नगरपंचायचीची नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर अवघ्या दोनच दिवसात त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे हा राजीनामा आहे की ‘नाराजी’नामा अशी चर्चा सध्या स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे.

संजय आवारी यांची एक कडवड शिवसैनिक म्हणून ओळख आहे. पक्षांनी देखील त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना तालुका प्रमुख या पदाची जबाबदारी दिली. ते पंचायत समितीचे उपसभापती देखील आहे. त्यांच्या राजीनाम्याला दोन दिवसांपूर्वी नगराध्यक्ष व उपाध्यपदासाठी घडलेल्या घडामोडींची पार्श्वभूमी असल्याची चर्चा स्थानिक राजकारणात रंगत आहे.

संजय आवारी यांचा नाराजीनामा?
नगराध्यक्ष पदासाठी वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला. ज्यांची संख्या अधिक त्या पक्षाचा नगराध्यक्ष असे गणित ठरले. नगराध्यक्ष पद मिळण्याची कोणतीही संधी नसताना शिवसेनेने भाजपची मदत घेत नगराध्यक्ष पद काबिज केले. त्यामुळे शिवसेनेच्या या मुसद्दी राजकीय डावपेचाची चांगलीच चर्चा होत आहे. मात्र दुसरीकडे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात सेनेला अपयश आले. आता भाजपसोबत सत्ता स्थापन करावी लागल्याने काही नेते नाराज असल्याचा कयास सध्या लावला जात आहे.  

संजय आवारी यांच्या राजीनाम्यामुळे सध्या मारेगाव तालक्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात न आल्याची माहिती आहे. दरम्यान याबाबत ‘वणी बहुगुणी’ने संजय आवारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल स्विच्ड ऑफ होता.

हे देखील वाचा:

मारेगाव नगरपंचायत निवडणूक: काँग्रेसच्या पराभवाचे खापर कुणाच्या डोक्यावर

Comments are closed.