निकेश जिलठे, वणी: महाविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बा. ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजय देरकर यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीला विधानसभा क्षेत्रातील हजारो नागरिकांनी सहभाग दर्शवत संजय देरकर यांना आपला पाठिंबा दर्शवला. विशेष म्हणजे रॅलीमध्ये काँग्रेसचे वामनराव कासावार यांच्यासह, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, माकप, किसान सभा इत्यादी पक्ष व संघटनेचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले. त्यांनी सहभागातून निवडणुकीत ते संजय देरकर यांच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे दाखवून दिले. रॅलीनंतर शासकीय मैदान येथे सभा घेण्यात आली. यावेळी बोलताना संजय देरकर यांनी एकजुटीने लढणार व जिंकणार, अशी आशा व्यक्त केली. तर यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2 हजार देऊ, असे आश्वासन दिले.
दु. 1 वाजता जत्रा मैदान येथील हनुमान मंदिरात संजय देरकर यांनी नारळ फोडले. त्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. ढोलताशा, डफडे, गोंडी वाद्यवृंद, डीजेच्या गजरात व कार्यकर्त्यांच्या जल्लोषात रॅली निघाली. रॅलीतील सजवलेल्या रथात संजय देरकर यांच्या सोबत वामनराव कासावार, टिकाराम कोंगरे, आशिष खुलसंगे, सुनील कातकडे, महेंद्र लोढा, कुमार मोहरमपुरी, घनश्याम आवारी यांच्यासह शिवसेना व मित्रपक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. सुमारे एक ते दीड किलोमीटर लांब ही रॅली होती. 8 ते 10 हजारांपेक्षा अधिक लोक या रॅलीत सहभागी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे वामनराव कासावार यांच्या उपस्थितीने सर्वांचेच लक्ष वेधले. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या सहभागाने रॅलीत जान फुंकली.
ही रॅली दीपक टॉकीज चौपाटी, सर्वोदय चौक, गाडगेबाबा चौक, तुटी कमान, गांधी चौक, खाती चौक, टिळक चौक असा मार्गक्रमण करीत शासकीय मैदानात रॅलीची सांगता झाली. दरम्यान संजय देरकर यांनी पुतळ्यांना अभिवादन केले. रॅलीनंतर संजय देरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शासकीय मैदानात सभा झाली. सभेत टिकाराम कोंगरे, कॉ. दिलीप परचाके, आशिष खुलसंगे, दिलीप भोयर, अरुणा खंडाळकर, किरण देरकर, अरविंद ठाकरे, राजेंद्र गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. संजय देरकर हे लोकाभिमुख चेहरा आहे. राजकारणातील त्यांचा अनुभव दांगडा आहे. संपूर्ण काँग्रेस त्यांच्या पाठिशी उभी राहणार, असे आश्वासन वामनराव कासावार यांनी आपल्या भाषणात दिले.
एकजुटीने लढणार, जिंकणार – संजय देरकर
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कापूस व सोयाबिनला सर्वाधिक भाव होता. यांनी एका सहीवर शेतक-यांचे कर्ज माफ केले. मात्र गद्दांरांना 50 खोके देत भाजपने उद्धव साहेबांचे सरकार पाडले. आज भाजपच्या काळात सोयाबिन आणि कापसाचा भाव खाली आला आहे. गोरगरीब, शेतमजूर, अल्पसंख्यांक, ओबीसी, दलित सर्वांचेच अच्छे दिन गेले आहे. महिला असुरक्षीत आहेत. भाजप विरोधातील ही लढाई आपण एकजुटीने लढणे गरजेचे आहे. आपण सर्व एकत्र लढणार व जिंकणार, असा विश्वास संजय देरकर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.लाडक्या बहिणींना 2 हजार रुपये देऊ – खा. संजय देशमुख
भाजपच्या काळात भ्रष्टाचार वाढला. टक्केवारी शिवाय काम होत नाही. शेतक-यांना वीज मिळत नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्था निर्माण झाली आहे. परिसरातील सर्वसामान्यांच्या समस्या दूर करण्याचे, गोरगरीबांचे अश्रु पुसण्याचे, सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम संजय देरकर करणार, यात शंका नाही. सर्वांनी एकदिलाने येऊन काम करण्याचा निश्चय केला आहे. संपूर्ण जिल्ह्यातच अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकाही ठिकाणी भाजपची जागा येणार नाही, अशी मला खात्री आहे. जर महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दोन हजार देऊ. शिवाय ज्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यांना देखील आम्ही योजनेत सहभागी करू. असे आश्वासन संजय देशमुख यांनी आपल्या भाषणात दिले.
कार्यक्रमाचे संचालन प्रवीण खानझोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुनील कातकडे यांनी मानले. रॅलीच्या यशस्वी आयोजनामुळे कार्यकर्त्यांमुळे उत्साह संचारला आहे. रॅलीच्या निमित्ताने लोकसभेनंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व नेते एकत्र आलेले दिसले. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी सोबत राहण्याची भूमिका घेतल्याने, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आला.
Comments are closed.