संजय खाडे यांचा शिंदोला सर्कलमध्ये प्रचाराचा झंझावात

जिवाभावाच्या माणसांनी घेतली संजय खाडे यांच्यासाठी बैठक

निकेश जिलठे, वणी: शनिवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा शिंदोला सर्कलमध्ये प्रचार दौरा पार पडला. यात शिरपूर, खांदला, आबई, कुर्ली, एनाडी, एनक, शिंदोला, कोलगाव, साखरा, कैलासनगर, मुंगोली, माथोली, शेलू इत्यादी गावांचा दौरा करण्यात आला. शिरपूर व शिंदोला येथे भव्य रॅली व प्रचार सभा घेण्यात आली. या रॅलीत हजारो लोकांनी सहभाग घेतला होता. तत्पुर्वी सकाळी वसंत जिनिंग सभागृह वणी येथे संजय खाडे मित्रपरिवारांची बैठक झाली. या बैठकीत हजारोंच्या जनसमुदायाने संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला.

दु. 12.30 वाजता प्रचार दौ-याला सुरुवात झाली. संजय खाडे यांच्या प्रचार ताफ्याने सर्वात आधी शिरपूर येथील कैलास शिखर देवस्थान येथे भेट दिली. महादेव मंदिरात भेट देऊन त्यांच्या प्रचाराला सुरूवात झाली. गावात भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी शिरपूर व परिसरातील हजारो नागरिकांनी पदयात्रेत सहभाग घेतला. लोकांनी शिट्टी वाजवून अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

शिरपूर नंतर प्रचार ताफा खांदला, आबई, कुर्ली, एनाडी, एनक या गावांचा दौरा करीत शिंदोला येथे पोहोचला. शिंदोला येथे पदयात्रा काढण्यात आली. तसेच कॉर्नर सभा घेण्यात आली. यावेळी बोलताना संजय खाडे म्हणाले की काँग्रेसचे अर्धे अधिक कार्यकर्ते व नेते तसेच विश्वास नांदेकर व त्यांचे सहकारी शिवसैनिक सोबत आहे. ग्रामीण भागात मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विजय आपलाच आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संजय खाडे यांच्या समर्थनार्थ बैठक
शनिवारी सकाळी वणीतील वसंत जिनिंग येथे संजय खाडे मित्रपरिवार व नातेवाईक यांची बैठक पार पडली. या बैठकीत एकमताने संजय खाडे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत संजय खाडे यांनी घरोघरी शिट्टी पोहोचवण्याचे आवाहन केले. यावेळी विश्वास नांदेकर, किरण नांदेकर यांनी मनोगत व्यक्त करीत संजय खाडे यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. बैठकीला हजारोच्या संख्येने समर्थक व महिला उपस्थित होत्या.

Comments are closed.