बहुगुणी डेस्क, वणी : श्रावण शुद्ध पौर्णिमेला आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर होणाऱ्या संस्कृत दिनाच्या निमित्ताने वणी नगरीत दिनांक 19 पासून 26 पर्यंत संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.संस्कृत भारती ची वणी शाखा ,जैताई देवस्थान आणि लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संस्कृत सप्ताहात दिनांक 19 रोजी शालेय विद्यार्थ्यांची संस्कृत सुभाषित लेखनस्पर्धा, 20 रोजी जनसंपर्क अभियान, 21 रोजी सरला ,सुगमा ,सुरसा या संस्कृत परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप हे एक कार्यक्रम घेण्यात येतील.
दिनांक 22 रोजी प्राचीन ऋषीमुनींनी लावलेल्या वैज्ञानिक शोधांची माहिती देणारी सचित्र प्रदर्शनी सायंकाळी 5 ते 8 या काळात जैताई मंदिरात आयोजित करण्यात येईल. अशा प्रकारची ही प्रदर्शनी विदर्भात प्रथमच आयोजित होत आहे हे विशेष उल्लेखनीय.
23 रोजी शिशू गटाची श्लोक पाठांतर स्पर्धा आणि विविध वेशभूषा स्पर्धा घेण्यात येईल. 24 रोजी नागपूर येथील प्राची मुळे आणि सहकार्यांच्या संस्कृत संगीत संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. 25 रोजी संस्कृतदिनाला सकाळी आठ वाजता एसपीएम विद्यालय ते जैताई देवस्थान अशी संस्कृत प्रभातयात्रा निघेल.
सायंकाळी संस्कृतदिनाच्या कार्यक्रमात डॉ. अनिल मुंजे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मोहन खेडकर हे प्रमुख उद्बोधन करतील. दिनांक 26 रोजी संस्कृत रक्षाबंधन कार्यक्रमाने या सप्ताहाची सांगता होईल. वणी तथा परिसरातील समस्त संस्कृतप्रेमी जनतेने या सर्वच कार्यक्रमांचा बहुसंख्येने लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.