सांस्कृतिक भवनाची वास्तू जमिनदोस्त करण्याचे काम युद्धपातळीवर
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार दुसऱ्यांदा भूमिपूजन
रवि ढुमणे, वणी: सांस्कृतिक वारसा असलेल्या वणीत पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सांस्कृतिक भवन इमारत उभी करण्यासाठी त्या काळी दहा लाखाचा निधी मंजूर केला होता. सदर अपूर्ण अवस्थेतच राहिली अन ऐनवेळी या इमारतीच्या बांधकामात बदल केल्याने सदर वास्तू जमीनदोस्त करण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली. या इमारतीचा भूमिपूजन सोहळा दोनदा होत आहे. मात्र वणीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असतांना याबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाही. परंतु एका दिवसात तयार करण्यात आलेली इमारत पाडण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. तर दुसरीकडे आजवर जागोजागी खड्डे असलेल्या रस्त्याची सुद्धा डागडुजी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. म्हणजेच मुख्यमंत्री येणार म्हणून वणीतील रस्ते चकचकीत करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे येथील नागरिक मरणयातना भोगत आहे.
सांस्कृतिक वारसा लाभलेले वणी शहर. म्हणतात ना!ज्याचं नाही कोणी. त्यानं जावं वणी. अगदी तसच! पण वणीची सध्या अवदसा झाली आहे. वणीला पाणी पाजणारी निर्गुडा नदी कोरडी टाक पडली आहे. नवरगाव धरणात पुरेसा जलसाठा नाही. जमिनीतील पाण्याची पातळी पूर्णतः खाली गेली आहे. परंतु राज्यकर्त्यांनी आतापर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप तरी मार्गी लावला नाही हेच खरे वणीकरांचे दुर्भाग्य आहे. सध्या वणीत अल्पसा पाणीपुरवठा होत आहे. मोकळ्या वस्तीत असणारे नागरिक पाण्याअभावी बाहेर शौचाला जातांना दिसत आहे. परिणामी हागणदारीमुक्त योजनेचा पाण्याअभावी पूर्णतः बोजवारा वाजला असल्याचे चित्र दिसत आहे. अशी वणीची अवदसा असतांनाच भूमिपूजन सोहळे व इतर कार्यक्रम आयोजित केले जात आहे.
गेल्या वीस वर्षांपूर्वी वणीत सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर केला होता. सांस्कृतिक भवन उभे देखील झाले पण ते अपूर्णच राहिले. या अपूर्ण इमारतीत काहींनी आश्रय घेतला होता. प्रशासनाकडून दुर्लक्षित असलेली ही इमारत केवळ अर्धवट राहिली. त्याकाळी दहा लाखाचा निधी म्हणजेच आजची किंमत किती असेल याचा अंदाज बांधता येईल. तर दुसरीकडे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सभा मंडप उभारला. लाखो रुपये खर्ची घालून इमारती तयार करण्यात आल्यात. पण या इमारतीमध्ये केवळ बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांचे साहित्य ठेवण्यासाठीच उपयोगात आणल्या गेल्यात. आजही तयार झालेल्या सभा मंडपाच्या इमारतीची गोडाऊन सारखी अवस्था झाली आहे. तर इकडे जुन्या सांस्कृतिक भवनाला पाडून त्याठिकाणी दुसरी इमारत बांधकाम करण्याचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या इमारतीचे दुसऱ्यांदा भूमिपूजन होत आहे. आणि ते सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते!
मुख्यमंत्री वणीत येणार म्हटल्यावर झोपलेलं प्रशासन जाग झालंय. लागलीच जुनी इमारत पाडण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली. तर दुसरीकडे या रस्त्यावरील असलेले जीवघेणे खड्डे सुद्धा बुजविण्याचे काम सुरू केलेत. आजवर वणीतील नागरिक जीवघेण्या खड्यातून वाटचाल करीत होती. पण ती कधी प्रशासनाला दिसली नाही आणि मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर धडाक्यात कामाला सुरुवात झाली. जुन्या सांस्कृतिक भवनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री दिलेला निधी पूर्णतः पाण्यात गेला. आता त्या ठिकाणी नवीन सांस्कृतिक भवन साकारतेय. नवीन भवन पूर्ण कधी होणार? की त्याची ही अवस्था पूर्वीसारखीच होईल. असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे.
आज घडीला वणीत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. आठवड्यातून एकदा पाणी मिळत आहे.परंतु या ज्वलंत प्रश्नःकडे बघायला राज्यकर्त्यांना तसेच लोकप्रतिनिधींना फुरसत नाही. मात्र मुख्यमंत्र्यांसाठी रस्ते चकचकीत करण्यात आले आहे. आणि वणीकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही युद्धपातळीवर हालचाली होत नाही हेच खरे वणीकरांचे दुर्भाग्य आहे. एकूणच केवळ देखावे दाखविणारे राज्यकर्ते जनतेला सोयीसुविधा देण्यास सपशेल फेल झाल्याचे दिसून येत आहे. आता मुख्यमंत्री वणीकरांचा। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविणार का? हाच जनतेचा खडा सवाल आहे.