सरोज भंडारी उत्कृष्ट अध्यापिका पुरस्काराने सन्मानित

जितेंद्र कोठारी, वणी : येथील रामदेवबाबा मूकबधीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरोज जिनेंद्र भंडारी यांना उत्कृष्ठ अध्यापिका म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. जैताई देवस्थान शिक्षण समितीतर्फे दरवर्षी मामा क्षीरसागर स्मृतिदिनी प्राचार्य राम शेवाळकर स्मृति उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात येते. दि. 6 एप्रिल रोजी रामदेव बाबा मंदिर सभागृहात नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.भालचंद्र चोपणे यांच्या हस्ते पुरस्काराच्या मानकरी सरोज भंडारी याना ₹ 2500 रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरु डॉ.भालचंद्र चोपणे, जैताई देवस्थान समितीचे सचिव माधवराव सरपटवार, दलित मित्र मेघराज भंडारी, अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य गजानन कासावार, सत्कार मूर्ती सरोज भंडारी, जिनेद्र भंडारी, नामदेव पारखी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात अपर्णा देशपांडे व कल्पना देशपांडे यांनी गायिलेल्या ‘कुंभारा सारखा गुरू नाही रे जगात’ या गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधवराव सरपटवार यांनी करून मामा क्षीरसागर यांनी अतिशय निष्ठेने चालवलेल्या आचार्य कुलाच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनतर उपस्थित अतिथीनी बोलतांना सरोज भंडारी यांची ज्ञाननिष्ठा, विद्यार्थीनिष्ठा  व समाजनिष्ठा आणि त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्याच्या गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या कार्यामुळे रामदेवबाबा मूक बधिर विद्यालय पूर्ण जिल्ह्यात अग्रणी आहे. अशा उत्कृष्ट अध्यापकांची शिक्षण क्षेत्राला गरज असल्याचे प्रतिपादन केले.

सत्कारमूर्ती सरोज भंडारी यांनी आपल्या यशाचे श्रेय मेघराजजी भंडारी यांच्या मार्गदर्शनाला आणि डॉ.जिनेंद्र भंडारी व सहकारी शिक्षकांच्या सहकार्याला दिले. या प्रसंगी जैताई देवस्थान समिती तर्फे अमरावती विद्यापीठावर सिनेट सदस्य म्हणून राज्यपालांनी नेमणूक केल्याबद्दल मुख्याध्यापक गजानन कासावार यांचा शाल, श्रीफळ व पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैताई देवस्थानचे विश्वस्त प्रा. चंद्रकांत अणे यांनी केले. आभार प्रदर्शन ज्योती मोहितकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंकुश भंडारी यांनी परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.