विवेक तोटेवार, वणी : शहरातील सावरकर चौक परिसरात भरदिवसा घरात घुसून करण्यात आलेल्या थरारक हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास संदीप साखरकर (वय 40) याने दिलीप नासरे (वय 50) यांच्या डोक्यावर हातोडीने वार केला. यात दिलीप नासरे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी सर्वत्र रक्ताचा सडा पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
जखमी नासरे हे शहरात इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेअरिंगचे दुकान चालवतात, तर आरोपी साखरकर हा फर्निचरचे काम करतो. दोघांचे चांगले संबंध होते. मात्र त्यांच्यात वेळेत टीव्ही रिपेअरिंग वरून वाद झाल्याची माहिती आहे.
दुपारच्या सुमारास नासरे हे आरोपीच्या घराजवळ होते. दरम्यान त्यांच्यात वाद झाला. आरोपीने हातोडीने नासरे यांच्यावर डोक्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. आरोपी साखरकर यांच्या घरासमोरच हा रक्तरंजित थरार घडला. नासरे हे जखमी होताच शेजा-यांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला व आरोपीला अटक केली. जखमीला तातडीने आधी खासगी व नंतर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत वणी पोलिसांसह स्थगुशा विभागाचे सुधीर पांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलिसांकडून सुरू आहे.



Comments are closed.