राजूर येथे सावित्रीबाई फुले महोत्सव साजरा
विविध स्पर्धा आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन
राजूर कॉ. (महेश लिपटे): राजूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवार आणि बुधवारी चाललेला हा महोत्सव महिला समारोह समिती व बहुजन स्डुडंट्स फेडरेशन, राजूर कॉ. यांच्या संयुक्त विद्ममाने घेण्यात आला.
या महोत्सवात दि. २४ डिसेंबर २०१७ ला सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम बक्षीस कु.स्नेहल अंबागडे, द्वितीय प्रफुल वाघमारे तर तृतिय बक्षीस अनिकेत निखाडे यांना मिळाले. दि. २ जानेवारी २०१८ ला सकाळी १० वाजता शो-ड्रील स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम पारितोषिक जि.प. शाळा पळसोनी, द्वितीय पुरस्कार जि.प. शाळा बोदाड तर तृतिय पुरस्कार जि. प. मराठी शाळा राजुरला मिळाला. सायंकाळी ५ वाजता नृत्य स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम पारितोषिक कु.प्राची बहादूरे, द्वितीय पारितोषिक कु.नंदनी सोयाम तर तृतिय पारितोषिक आकांक्षा जुमडे यांना मिळाले.
दि. ३ जानेवारी २०१८ ला सकाळी १० वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणूकीनंतर लगेच उद्घाटन समारंभाला सुरूवात झाली, या कार्यक्रमातच आयोजित स्पर्धेचे बक्षिस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन खंडाळकर मॅडम यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला वक्ते म्हणून प्रणिता मो.असलम, सरपंच राजूर, दर्शना मानवटकर, सरपंच, भांदेवाडा हे होते. या कार्यक्रमाचे सूूत्र संचलन रक्षा दुर्गमवार यांनी केले. तर प्रास्तावीक सुनिता कुंभारे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रतिमा दुधे यांनी केले.
उद्घाटन कार्यक्रमादरम्यान लोढा हॉस्पीटल वणी, सुगम हॉस्पीटल वणी, रुग्न कल्याण समिती प्रा.आ. केंद्र राजूर तसेच आशा सेविका यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर पार पडले. संध्याकाळी बालकीर्तनकार कु.साक्षी अतकरे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला समारोह समिती व बहुजन स्डुडंट्स फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.