परप्रांतीय अण्णांचा परिसरात अवैध सावकारीचा धंदा जोमात

कर्जवसुलीसाठी तगादा, प्रशासन देणार का लक्ष?

0

नागेश रायपुर,मारेगाव: अवघ्या राज्यात आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथील अवैध सावकारांचे जाळे पसरले आहे. या अण्णा लोकांनी आता आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणा-या मारेगावातही चांगलेच पाय पसरले आहे. मारेगाव तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यात या परप्रांतीय अवैध सावकारांनी मोठ्या प्रमाणात सावकारीचा धंदा थाटला असून या सावकारी पाशात आता शेतकरी, शेतमजुर, व्यवसायीक अडकले आहेत. त्यांच्या तगाद्यामुळे शेतकरी, शेतमजूर अडचणीत आले आहे.

परप्रांतातून आलेले हे अण्णा 2 हजारांपासून ते लाख रुपयांपर्यंत तात्काळ कर्ज देतात. त्यामुळे अडचणीत सापडलेला व्यक्ती गरजेपोटी त्यांच्याकडून कर्ज घेत आहे. मात्र याचे व्याज हे डोळे पांढरे करणारे आहे. दक्षिणेतील राज्यातून जवळपास 12 च्या वर अण्णा सावकार वणी, पांढरकवडा येथे राहून आपले नेटवर्क चालवत आहे. आठवड्यातून एक दिवस यांचा कर्ज वसूलीचा आहे. जर कर्जाचा हप्ता दिला नाही तर अरेरावी करीत धमकी देण्याचे प्रकारही समोर येत आहे.

अशी चर्चा आहे की परप्रांतीय अण्णा सावकार हे देशातील श्रीमंत देवस्थान तिरुपती बालाजी या संस्थेकडून एक टक्का व्याज दरावर कर्ज उचलून परिसरात दहा ते विस टक्के व्याजदरावर कर्ज वाटत आहेत. गरीब, दारिद्र्य, सततची नापिकी यांने हवालदिल झालेला शेतकरी, तर जीएसटी, नोटबंदी याने खचलेला व्यापारी या सावकारांचे सावज झाले आहेत.

आधीच यवतमाळ जिल्ह्यात कर्जबाजारीपणामुळे शेकडो शेतकरी, शेतमजुरांनी आत्महत्या केलेल्या आहेत. यातच आता अवैध सावकारांनी परिसरात सावकारीच्या माध्यमातून लुटण्याचा धंदा सुरू केल्याने तालुक्यातील गरीब शेतकरी, शेतमजूर यांचे आर्थिक शोषण होत आहे. या सावकारांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी आता तालुक्यातून होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.