…. अन् शाळा क्र 8 शाळेत अवतरील गोकुळ नगरी

गोकुळाष्टमी निमित्त वेशभूषा, चित्रकला, अभिनय स्पर्धेचे आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: सोमवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 8 मध्ये गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी राधा कृष्ण वेशभूषा, अभिनय स्पर्धा, श्रीकृष्ण रेखाटन, सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली. दररोजचा गणवेश, अभ्यास व शिस्तप्रिय वातावरणात वावरणारे चिमुकले गोकुळाष्टमी निमित्त शाळेत बाळ कृष्ण आणि राधेच्या रुपात सजून आले होते. वेशभूषेतील विद्यार्थी, मुलांनी काढलेले चित्र, सजावट यामुळे शाळेत गोकुळनगरी अवतरल्याचे चित्र दिसून आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक किशोर चौधरी होते तर प्रमुख पाहुणे न.प. शाळा क्र 2 चे मुख्याध्यापक अविनाश पालवे होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष मनीषा शिवरकर यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. राधा कृष्ण वेशभूषा, श्रीकृष्ण चित्र रेखाटन, अभिनय व सजावट स्पर्धेला विद्यार्थ्यांनी स्पर्धेत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व स्पर्धेचे परीक्षण अविनाश पालवे यांनी केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. किरण जगताप यांनी केले तर सूत्र संचालन सुनीता जकाते यांनी केले. कु. नीलिमा राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मिठाई देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेच्या मदतनीस निशा कावडे, शिक्षक अविनाश तुंबडे, देवेंद्र खरवडे यांनी सहकार्य केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.