पूरग्रस्त गावात चा-याची भीषण टंचाई, जनावरे उपाशी…
वाहून गेला शेतक-यांचा चारा, अनेकांचा चारा सडला, खनिज निधीतून मदतीची विजय पिदूरकर यांची मागणी
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील 11 गावांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांचे जनावरे, बि-बियाणे, खते तसेच जनावरांचा चारा पुराच्या पाण्याने वाहून नेला. तर अनेक शेतक-यांचा चारा पाण्यामुळे सडला आहे. त्यामुळे आता जनावरांच्या चा-याचा प्रश्न कसा सोडवावा या पेचात सध्या शेतकरी अडकला आहे. जर दोन दिवसात चा-याची समस्या सुटली नाही तर जनावरे उपाशी मरेल अशी भीती सध्या पूरग्रस्त गावातील शेतकरी व्यक्त करीत आहे. प्रशासनाने व सेवाभावी संस्थांनी चा-याची मदत करावी अशी मागणी पूरग्रस्त भागातील शेतकरी करीत आहे.
सेलू, भुरकी, कोना, झोला, उकणी, सावंगीसह 11 गावात पुराने वेढा घातला होता. यातील काही गावातील लोकांना सुरक्षीत ठिकाणी हलवण्यात आले होते. आता पूर ओसरल्यावर गावकरी गावात पोहोचले आहे. सध्या प्रशासन, सेवाभावी संस्था व नेत्यांद्वारे गावक-यांना धान्याच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था होत आहे. पण जनावरांच्या चा-यांचा मात्र भीषण समस्या उद्भवली आहे.
आम्ही तर जगू पण जनावरांना कसे जगवायचे?
पुराच्या पाण्यात आमचा चारा वाहून गेला. तर काही चारा पाण्यामुळे सडला. सध्या चिखल असल्याने बाहेरून चारा आणताही येत नाही. चा-याची परिस्थिती इतकी भीषण आहे की जर आणखी दोन दिवस चारा मिळाला नाही तर जनावरांचा जीवही जाऊ शकतो अशी आपबिती ‘वणी बहुगुणी’कडे पूरग्रस्त शेतक-यांनी बोलून दाखवत प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.
खनिज विकास निधीतून मदत करा – विजय पिदूरकर
पूर येण्याच्या एक आठवडा आधीपासूनच परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. सध्या पुरामुळे शेतकरी तसेच गावातील रहिवाशांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना सावरण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. अनेक जनावरे वाहून गेली आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरांच्या चा-याची भीषण समस्या आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना खनिज विकास निधीतून तात्काळ मदत व्हायला हवी.
– विजय पिदूरकर, मा. जि.प. सदस्य
Comments are closed.