शहीद शेतकरी कलश यात्रा आज वणीत
दुपारी 2 वाजता वणी येथे तर 11 वा. पाटणबोरी व 4 वा. मारेगाव येथे अभिवादन सभा
जब्बार चीनी, वणी: शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे एका केंद्रीय मंत्र्याच्या गाडीने चिरडले. घन घटनेत चार शेतकरी व एका पत्रकाराचा मृत्यू झाला तर 12 पेक्षा अधिक शेतकऱी गंभीर जखमी झाले होते. शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील ही अत्यंत निंदणीय घटना असून सध्या याचा देशभर निषेध केला जात आहे. या अनुषंगाने शहीद शेतकरी अस्थीकलश यात्रेचे आयोजन व अभिवादन सभेचे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे.
ही यात्रा आज नांदेड जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात येणार आहे. आज शुक्रवारी दिनांक 10 नोव्हेंबरला पाटणबोरी येथे ही कलश यात्रा पोहोचणार आहे. दुपारी 11 वाजता पाटणबोरीतील बाजार चौकात अभिवादन सभा घेण्यात येणार आहे. त्यानंतर ही यात्रा वणीकडे रवाना होणार आहे. दुपारी 2 वाजता वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन सभा होणार आहे. तर दुपारी 4 वाजता मारेगाव येथील मार्डी रोड शहीद भगतसिंग चौकात अभिवादन सभा होईल. यवतमाळ जिल्ह्यातून हा अस्थीकलश वर्धा जिल्हा येथे जाणार आहे.
अस्थीकलशाला अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातील समस्त शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चा कृती समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेने केले आहे.
शहीद शेतकऱ्यांच्या अस्थीकलशाला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रव्यापी अस्थीकलश अभिवादन यात्रा 27 ऑक्टोबरला पुणे येथील क्रांतीज्योती महात्मा फुले वाड्यातून निघाली आहे. 18 नोव्हेंबरला मुंबई येथे हुतात्मा चौकात या अभिवादन कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.