अद्वैत वेदान्ताची मांडणी म्हणजे भारतीय सिद्धांताचा मुकुटमणी : प्रा. डॉ. स्वानंद पुंड.
संस्कृत रसास्वाद व्याख्यानमालेचा उपक्रम
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: जगतगुरु शंकराचार्यांनी केलेली अद्वैत वेदान्ताची मांडणी म्हणजे भारतीय सिद्धांताचा मुकुटमणी असून मायावाद हा ना पलायनाची भूमिका आहे ना नैराश्याची.उलट प्राप्त परिस्थितीत अत्यंत आनंदाने जगण्याचा तो सगळ्यात सुंदर मार्ग आहे असे निरुपण प्रा. डॉ. स्वानंद पुंड यांनी केले. जैताई देवस्थान, नगरवाचनालय, लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा संस्कृत विभाग आणि संस्कृत भारतीच्या वणी शाखेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जगतगुरु शंकराचार्य जयंतीच्या निमित्ताने ते बोलत होते. प्रत्येक महिन्यात घेण्यात येणाऱ्या संस्कृत रसास्वाद व्याख्यानमालेचा या महिन्याचा उपक्रम आचार्य जयंतीच्या निमित्ताने त्यांना समर्पित करण्यात आला.
पुढे बोलताना डॉ. पुंड म्हणाले की, आपल्या केवळ ३२ वर्षांच्या आयुष्यामध्ये संपूर्ण विश्वाला स्तिमित करणार्या आणि उत्तरावर्ती काळात झालेल्या प्रत्येक अभ्यासकाला अनिवार्यपणे दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या दिव्य कार्याचे रचयिता असणारे भगवान जगतगुरु आदि शंकराचार्य हे भारतभूमीला लाभलेले वरदान आहे.
पूज्य आचार्यश्रींनी केलेली अफाट तथा विविधांगी ग्रंथरचना ,चार पीठांची स्थापना, दशनामी संघटनेची उभारणी ,मठांची संरचना तथा त्या प्रत्येक कृतीमागील त्यांची अलौकिक विचारसरणी या सगळ्या गोष्टींना त्यांनी उलगडून दाखविले.
आचार्यांनी मांडलेल्या माया वादाने लोकांना निराश किंवा निष्क्रिय केले नसून जीवनाकडे पाहण्याचा तो कसा अत्यंत शास्त्रीय मार्ग आहेत हे सांगत असताना त्यांनी माया वादाच्या वैज्ञानिक भूमिकेला वैज्ञानिक परिभाषेत उलगडून दाखविले.
कार्यक्रमाच्या आरंभी प्रणिता पुंड आणि रेणुका अणे यांनी श्री गुरुपादुका स्तोत्र सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रणिता भाकरे यांनी केले. वणीत प्रदीर्घकाळाने संपन्न झालेल्या या आचार्य जयंतीला वणीतील आचार्य प्रेमी जनतेने दिलेली लक्षणीय उपस्थिती कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होय.