सर्जा-राजांच्या प्रदर्शनांनी गाजले जत्रा मैदान, उडवला 30 जोड्यांनी धुरळा

विदर्भकेसरी शंकरपटाचे थाटात उद्घाटन, गणेशपूरच्या कु. राधाने गाजवले मैदान

निकेश जिलठे, वणी: क्षणोक्षणी उत्कंठा शिगेला पोहोचत होती. प्रेक्षकांच्या नजरा क्षणभरही हलत नव्हत्या. कोण बाजी मारेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यासारखं प्रत्येक जोडीनं सर्वांनाच गोठवून ठेवलं. क्षणोक्षणी रंगत वाढतच राहिली. सामन्यांचं अस्सल मायबोलीत धावतं वर्णन रोमांचित करणारं होतं. एका विलक्षण थराराचा अनुभव देणारा शंकरपट जत्रा मैदानावर धुरळा उडवीत होता. पहिल्याच दिवशी 30 जोड्यांनी रसिकांची मने जिंकली. शंकरपटाचा हा थरार पाहण्यासाठी केवळ वणीच नव्हे तर पंचक्रोशीतील आणि आजूबाजूच्या तालुक्यातील अनेक रसिकांनी हजेरी लावली. प्रेक्षकांनी दमदार जोड्यांना मनापासून दाद दिली. मंगळवारी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी या शंकरपटाचे थाटात उद्घाटन झाले. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संजय खाडे आणि मित्र परिवाराने या शंकरपटाचं आयोजन केलं आहे. आज संध्याकाळी 6 वाजता झाडीपट्टी रंगभूमिवरील सुपरहीट नाटक हंबरते वासराची गाय या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. 

कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार वामनराव कासावार होते. तर अध्यक्ष हिंगणघाटचे माजी आमदार राजू तिमांडे होते. राजेंद्र गायकवाड, नरेंद्र ठाकरे, अरुणा खंडाळकर, प्रा. शंकर व-हाटे, नरेंद्र ठाकरे, राजाभाऊ पाथ्रडकर, अरुणा खंडाळकर, प्रमोद वासेकर, संजय निखाडे, पुरुषोत्तम आवारी, तेजराज बोढे यांची कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

दुपारी 2 वाजता मान्यवरांच्या हस्ते पटाच्या मैदानाची पूजा करण्यात आली. त्यानंतर रितसर फित कापून पटाचे उद्घाटन करण्यात आले. पहिली उद्घाटनपर जोडी ही श्रृती वाळगे या 18 वर्षीय तरुणीने हाकली. त्यानंतर वणी विधानसभा क्षेत्रासाठी आयोजित गावगाडा या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील 30 बैलजोड्या हाकण्यात आल्या.

राधाने गाजवले मैदान
गावगाडा स्पर्धेत रांगणा येथील शेतकरी गुणवंत वांढरे यांच्या तेजा व वायफर या जोडीने अवघ्या 8.1 सेकंदात अंतर कापत पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे राजूर इजारा येथील भाविका मिलमिले व गणेशपूर (वणी) येथील कु. राधा बोबडे या दोन तरुणींनी सहभाग घेतला होता. राधा हिने मैदान गाजवत अवघ्या 8.33 सेकंदात अंतर कापत पाचवा क्रमांक पटकावला. या दोन्ही तरुणीच्या जिद्दीचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले.

बुधवारी मुख्य विदर्भ केसरी शंकरपटाला सुरुवात झाली. दुस-या दिवशी 40 पेक्षा अधिक जोड्या हाकण्यात आल्या. संध्याकाळी 6 वाजता नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी संध्याकाळी 4 कार्यक्रमाची सांगता व बक्षिस वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खाडे यांच्या मार्गदर्शनात संजय खाडे मित्रपरिवार परिश्रम घेत आहे.

Comments are closed.