मूर्ती दूध पित असल्याच्या अफवेने वणीतील मंदिरात झुंबड
राज्यभरात पसरलेल्या अफवेचे पेव वणीतही..
जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील शास्त्रीनगर येथील एका मंदिरात नंदी दूध पित असल्याच्या अफवेने रात्री चांगलीच झुंबड उडाली. लोकांनी दूध आणि पाणी घेऊन मंदिरात एकच गर्दी केली. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही अफवा पसरली. त्यामुळे शहरातील लोकांनी रात्री शास्त्रीनगरकडे धाव घेतली. मात्र काही वेळाने तिथे गेलेल्या लोकांची निराशा झाली. 10 वर्षांपूर्वी वणीतील जटाशंकर मंदिरातही असाच प्रकार झाला होता. दरम्यान हा चमत्कार नसून विज्ञान आहे. त्यामुळे अशा चमत्कारांना बळी पडू नये असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेद्वारा करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की शहरातील शास्त्री नगर भागात एक हनुमान मंदिर आहे. या मंदिरात एक नंदीची मूर्ती आहे. शनिवारी दिनांक 5 मार्च रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास एका भाविकाने मूर्तीला दूध पाजण्याचा प्रयत्न केला असता त्यांना नंदीने दूध पिल्याचा भास झाला. भाविकाने ही बाब इतरांना सांगितली. ही बातमी वा-यासारखी परिसरात पसरली. यावरून रात्री अनेकांनी दूध, पाणी घेऊन मंदिरासमोर गर्दी केली.
हा प्रकार रात्री 11 वाजेपर्यंत सुरू होता. मात्र काही वेळाने मूर्तीने दूध शोषणे बंद केले. त्यामुळे लोकांची चांगलीच निराशा झाली. दरम्यान मूर्तीने आधी दूध पिले, पण काही लोकांनी मूर्ती अशुद्ध केल्याने मूर्तीने नंतर दूध पिणे बंद केले असा दावाही निराश झालेल्या अनेक भाविकांनी केला. दरम्यान रात्री ही बाब माहिती होताच वणीतील अनेकांनी शास्त्री नगर येथील मंदिरात धाव घेतली होती.
जटाशंकर मंदिरातही झाला होता असा प्रकार
नाशिकमध्ये शनिवारी सकाळी एका मंदिरात नंदीच्या मूर्तीने दूध पिल्याची अफवा चांगलीच पसरली. दुपारपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभरात ही अफवा पसरली. त्यावरून विविध गावांमध्ये याची खात्री करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला व या अफवेला चांगलेच पेव फुटले. संध्याकाळी चंद्रपूर येथेही असाच प्रकार घडला. इतर गावातील प्रकार बघूनच वणीतही नंदीला दूध पाजण्याचा प्रयत्न केला असावा व त्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 10 वर्षांआधी वणीतील जटाशंकर मंदिरात देखील असाच प्रकार घडला होता. मात्र पुढे हा चमत्कार नसल्याचे स्षष्ट झाले. 27 वर्षांपूर्वी गणपतीने दूध पिल्याच्या अफवेने राज्यात एकच खळबळ उडवून दिली होती. शास्त्रीनगर येथील घटनेमुळे जुन्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्यात.
मूर्ती दूध पिणे हा चमत्कार नाही तर विज्ञान – प्रा. महादेव खाडे
पाणी शोषूण घेणे ही एक सर्वसामान्य वैज्ञानिक बाब आहे. याचा चमत्काराशी काहीएक संबंध नाही. एखाद्या मूर्तीच्या पृष्ठभागाला पाणी किंवा दूधाचा स्पर्ष केल्यास ती वस्तू पाणी किंवा दूध शोषूण घेते. त्यालाच पृष्ठीय ताण (सरफेस टेन्शन) म्हटले जाते. तर दुसरी बाब म्हणजे मूर्ती जुनी झाल्यास तिथे हवेची पोकळी निर्माण होते. त्यामुळे मूर्ती दूध किंवा पाणी शोषूण घेते. फक्त मूर्तीच्या मुखालाच नाही तर कोणत्याही भागाला पाण्याचा स्पर्ष केल्यास असे होते. अशा घटना जरी ख-या वाटत असल्या तरी ते विज्ञानामुळे होत असल्याने अशा अंधश्रद्धेला बळी पडू नये.
– प्रा. महादेव खाडे. अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद वणी
हे देखील वाचा:
Comments are closed.