शेतकरी न्याय यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद, गावागावात जंगी स्वागत

वनोजा येथून थाटात सुरुवात, शेतकरी, तरुण, महिलांचा यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग

बहुगुणी डेस्क, वणी: काँग्रेसच्या वतीने वणी विधानसभा मतदारसंघात काढण्यात आलेल्या शेतकरी न्याय यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी गावात या यात्रेचे जंगी स्वागत केले जात आहे. शुक्रवारपासून शेतकरी न्याय यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला. मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी येथील जानामाय कासामाय देवस्थानात माजी आमदार वामनराव कासावार यांच्या उपस्थितीत कलावती बांदूरकर यांनी या यात्रेला हिरवी झेंडी दाखविली. वसंत जिनिंगचे अध्यक्ष व झरी तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे हे या यात्रेचे मुख्य आयोजक आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात शेतकरी शेतमजूर युवक बेरोजगार यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने वणी विधानसभा क्षेत्रात शेतकरी न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज या यात्रेला नवरगाव येथून प्रारंभ होणार आहे.

शुक्रवारी वनोज येथील उद्घाटनानंतर ही यात्र हिवरा, शिवणी, कानडा, चोनोडा, चोपण, पार्डी, मार्डी, खैरगाव, चिंचमंडळ, दापोरा इत्यादी गावात गेली. गावात यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. तर शनिवारी या यात्रेने बोरी (गदाजी) येथून सुरुवात झाली त्यानंतर कुंभा, बुरांडा, नरसाळा, सराटी, मेंढणी, खंडणी, रोहपट, म्हैसदोडगा या ठिकाणचा दौरा करीत रात्री उशिरा सगणापूर येथे यात्रेचा समारोप झाला. आज या यात्रेला नवरगाव पासून सुरुवात होणार असून त्यानंतर करणवाडी, मारेगाव, मांगरुळ, कोलगाव असा प्रवास ही यात्रा करणार आहे. यात्रेचा दिवसाचा समारोप वेगाव येथील जगन्नाथ मठात होणार आहे. उद्यापासून ही यात्रा झरी तालुक्याचा दौरा करणार आहे.  

यात्रेच्या उद्घाटन कार्यक्रमाला नरेंद्र पाटील ठाकरे, अरुणा खंडाळकर, टिकाराम कोंगरे, संजय खाडे, गौरीशंकर खुराणा, अॅड. देवीदास काळे, महिला जिल्हाध्यक्ष संध्या बोबडे, राजू येल्टीवार, ओम ठाकूर, डॉ. मोरेश्वर पावडे, मारोती गौरकार, राजू कासावार, घनश्याम पावडे, अशोक पांडे, राहुल दांडेकर, अंकुश माफूर, रवी धानोरकर, गजानन खापणे, प्रकाश मॅकलवार, नीलेश येल्टीवार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यात्रेत वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या यात्रेला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन आशिष खुलसंगे यांनी केले आहे. 

घोडदरा येथील विद्यार्थ्यांचे निवेदन
शेतकरी न्याय यात्रेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी लोक आशिष खुलसंगे यांना विविध समस्येवर निवेदन देत आहेत. घोडदरा येथील विद्यार्थ्यांना मारेगाव येथे शिक्षणासाठी जाण्यास कोणतेही वाहन नाही. त्यांना 3 किलोमीटरची पायपीट करत खडकी बस थांब्यावर जावे लागते. शिवाय पावसाळ्यात विद्यार्थ्यांना ओले होत थांब्यावर जावे लागते. त्यामुळे घोडदरा येथील विद्यार्थ्यांनी यात्रेत निवेदन देत बससेवा सुरु करण्याबाबत निवेदन दिले.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेती साहित्यावरील जीएसटी रद्द करावा, 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शन आणि सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करावी, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, वणी विधानसभा क्षेत्रातील पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ द्यावा, कोळसा खाणी व सिमेंट कंपनीमध्ये स्थानिकांना 80 टक्के रोजगार द्यावा, यासह अन्य मागण्यांना घेऊन ही यात्रा काढण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.