काँग्रेसच्या शेतकरी न्याय यात्रेचा दुसरा टप्पा गणेशोत्सवानंतर

ग्रामीण भागातील दौ-यानंतर वणी शहरात भव्य सभेने यात्रेचा समारोप

बहुगुणी डेस्क, वणी: शेतकरी न्याय यात्रेच्या पहिल्या टप्पा यशस्वी ठरल्यानंतर शेतकरी न्याय यात्रेचा दुसरा टप्पा गणेशोत्सवानंतर सुरु होणार आहे. वणी तालुक्यातील शिरपूर-शिंदोला, लालगुडा-लाठी या दोन सर्कलचा दौरा केल्यानंतर वणी शहरात यात्रेचा समारोप होणार आहे. यावेळी भव्य सभा होणार आहे. खा. प्रतिभा धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्त्वात ही यात्रा होत आहे. काँग्रेसचे झरी तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे हे या यात्रेचे मुख्य संयोजक आहेत.

भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर शेतकरी न्याय यात्रा वणी विधानसभा क्षेत्रात काढण्यात आली. यात्रेचा पहिला टप्पा 9 ऑगस्ट रोजी सुरु झाला. शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून ही यात्रा काढली गेली. खनिज विकास निधीचा वापर, रस्त्यांच्या कामात झालेला भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे काम यासह विविध स्थानिक प्रश्नाना या यात्रेद्वारा वाचा फोडण्यात आली. पहिल्या टप्प्यात मारेगाव व झरी तालुका तसेच वणी तालुक्यातील घोन्सा-कायर, चिखलगाव-राजूर सर्कलमध्ये ही यात्रा निघाली. या यात्रेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी यात्रेचे सर्वसामान्य नागरिकांद्वारे स्वागत करण्यात आले. 

पहिल्या टप्प्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर गणेशोत्सवानंतर आता दुसरा टप्पा होत आहे. दुस-या टप्प्यात शिरपूर-शिंदोला, लालगुडा-लाठी हे सर्कलचा दौरा केला जाणार आहे. वणी शहरात या यात्रेचा समारोप केला जाणार आहे. यात्रेचे नियोजन व तयारी पूर्ण झाली असून लवकरच तारीख जाहीर केली जाणार आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून यात्रेचे मुख्य संयोजक आशिष खुलसंगे यांनी दिली. यात्रेच्या यशस्वीतेसाठी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या यात्रेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे यांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.