शिंदोला परिसरातील अवैध धंद्याविरुद्ध महिलांचा एल्गार

अवैध धंदे बंद न झाल्यास करणार ठिय्या आंदोलन

0

विलास ताजने, मेंढोली: शिरपूर पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या शिंदोला, परमडोह, कळमना, पाथरी आदी गावात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू आहे. सदर दारू विक्री बंद करण्यासाठी अनेकदा ग्रामसभेद्वारा निवेदने देऊनही पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी त्रस्त महिलांनी लोकप्रतिनिधीच्या मदतीने पोलिस ठाण्यावर धडक देऊन परिसरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी दि. ११ मंगळवारी निवेदनाद्वारे शिरपूर पोलिसांना केली आहे.

वणी तालुक्यातील शिंदोला परिसरात सिमेंट प्रकल्प, वीज निर्मिती प्रकल्प, कोळसा खाणी असल्याने सदर परिसरात रोजगाराच्या निमित्ताने गावाचा पसारा वाढला. नेमका याच संधीचा फायदा घेत अवैध धंदे सुरू झाले. अर्थातच याला कुणाचे पाठबळ आहे हे सर्वश्रुतच आहे. या अवैध दारू विक्रीमूळे दारू सहज गावागावात उपलब्ध होऊ लागली. परिणामी युवक वर्ग, शालेय विद्यार्थी दारूच्या आहारी जाऊन कुटुंबातील स्वास्थ्य बिघडू लागले.

गावात, रस्त्याच्या कडेला दारू विक्री, मटका सुरू असतो. नेहमी सामान्य माणसाला दिसणारा प्रकार शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांना कसा काय दिसत नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात. महिलांनी अनेकदा दारू विक्रेत्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र थातुरमातुर कार्यवाही होत असल्याने पुन्हा अवैध दारूविक्री सुरु होते. या सर्व प्रकाराची झड महिलांना सोसावी लागते. अनेकांचे सुखी संसार बिघडले तर अनेक आईवडिलांना आपली तरुण मुले गमवावी लागली.

घुगूस, वणी परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी स्थानिक अवैध धंदे करणाऱ्याच्या मदतीने आपले बस्तान मांडले आहे. नुकताच पोळा सण साजरा झाला. यावेळी शिरपूर पोलिसांनी गावागावात फेरफटका मारला. परंतु अवैध दारू विकी खुलेआम सुरू असल्याचे चित्र दिसत होते. मंगळवारी पाथरी फाट्याजवळ महिलांनी अवैध दारू पकडली. परंतु पोलिस घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यास तयार नव्हती. परिणामी संतापलेल्या महिलां पुरुषांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली.

परिसरात चालू असलेल्या अवैध धंद्याबद्दल अवगत केले. आणि ३० सप्टेंबर पर्यंत शिंदोला, कळमना, परमडोह आदी गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. अन्यथा पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.

यावेळी पंचायत समिती सदस्य संजय निखाडे, कळमनाचे सरपंच शांताराम राजूरकर, परमडोहचे उपसरपंच संदीप थेरे, शिंदोलाचे उपसरपंच किशोर किनाके, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष कळमनाचे बाबाराव बोबडे, परमडोहचे रामभाऊ वाभीटकर, सुषमा राजूरकर, लता ठाकरे, उषा राजूरकर, सुनिता काकडे, सपना केळझरकर, सविता दरेकर, मंगला येरेकर, अनुसया डवरे आदी बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.