अबब… शिरपूरपासून शिंदोला चक्क 190 किलोमीटर !

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चुकीचा कळस

0

विलास ताजने, मेंढोली: शिरपूरपासून शिंदोला कळमणा हे अंतर 190 किलोमीटर दाखवण्याचा प्रकार सध्या चर्चेचा विषय झाला आहे. शिरपूरपासून जसजसे शिंदोल्याकडे जाणार तसतसे हे अंतर पुढे 191 किमी, 192 किमी असे वाढत जाते. या प्रकारामुळे चालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. मात्र अद्यापही ही गंभीर बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वणी ते शिंदोला हे अंतर सुमारे 30 किलोमीटरचे आहे. शिरपूरपासून शिंदोल्याचे अंतर हे 17 किलोमीटर आहे. त्यामुळे माईलस्टोनवर (किलोमीटर दर्शवणारा दगड) 17 किलोमीटर हे अंतर लिहिणे गरजेचे होते. मात्र या माईलस्टोनवर चक्क 190 किलोमीटर अंतर दाखवण्यात आले आहे. कळस म्हणजे ही चूक एकदा नाही. पुढे हे अंतर 191 किमी, 192 किमी असे वाढत जाते. तर दगडाच्या दुस-या बाजूला वणीकडे जाणा-या दिशेने वणीचे अंतर योग्य लिहिले आहे.

उन्हाळ्यात वणी शिंदोला हा रस्ता तयार करण्यात आला. 15 दिवसांआधी या नवीन तयार झालेल्या मार्गावर माईलस्टोन लावण्यात आले. शिरपूरपर्यंत माईलस्टोन बरोबर आहे. मात्र शिरपूरनंतर हे अंतर चुकीचे लिहिण्यात आलेले आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र चुकीचे किलोमीटर दर्शक लावल्याने चालकांची तारांबळ उडू शकते. मात्र या गंभीर प्रकाराकडे अद्यापही साबांविचे लक्ष नाही.

अशी झाली चूक…
माईलस्टोनवर समोरच्या दिशेने गावाचे अंतर लिहिले जाते. तर त्याच्या बाजूला म्हणजे जाडी असलेल्या दगडावर किती दगड लावले याची संख्या लिहिली जाते. मात्र पेंटरने जाडीवर लिहिण्यात येणारी दगडाची संख्या किलोमीटरच्या जागेवर लिहीली आहे. शिरपूरपर्यंत 190 माईलस्टोन लावण्यात आले आहे. 190 ही संख्या दगडाच्या जाडीवर तर लिहिली आहे. सोबतच हीच संख्या किलोमीटर लिहिण्याच्या जागेवरही लिहीली आहे.

सध्या परिसरात हा विषय चर्चेचा ठरत असून यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची खिल्ली उडवली जात आहे. या चुकीमुळे चालकांची तारांबळ उडू शकते म्हणून ही चूक लगेच सुधारावी अशी मागणी मुंगोलीचे सरपंच रूपेश ठाकरे यांनी केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.