बहुगुणी डेस्क, वणी: ही भूमी शूरवीरांची आणि संत महात्म्यांची आहे. याच भूमीत छत्रपती शिवरायांनी इतिहास घडविला. छत्रपतींचा हा देदीप्यमान इतिहास आपण काळजात कोरला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हृदयात उतरायला पाहिजे. असे प्रतिपादन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार वणी नगर पालिकेद्वारा स्थानिक शिवतीर्थावर शिवजयंती उत्साहात साजरी झाली.
यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, उपविभागीय अधिकारी नितीन इंगोले, तहसिलदार निखिल धुळधर, नायब तहसिलदार अशोक ब्राह्मणवाडे, ना.त. रामचंद्र खिरेकर, वणी नगर पालिकेचे मुख्याधिकारी सचिन गाडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय तेलतुंबडे व मान्यवर विचारपिठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांनी अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. नंतर महाराष्ट्रगीताने मुख्य कार्यक्रम सुरू झाला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना संजय देरकर म्हणाले की, स्वराज्य कसं असावं याचा आदर्श छत्रपतींनी संपूर्ण विश्वाला दिला. त्यांची देदीप्यमान कारकीर्द काळजात कोरून घ्यावी. त्यांचा आदर्श आपल्या काळजात कोरून घ्यावा. ते आपल्या मनात उतरले पाहिजे. आपल्या हृदयात उतरले पाहिजे. खरंच त्याची आज गरज आहे. 1993 मध्ये देरकर नगराध्यक्ष होते. त्यावेळेस शहरातल्या मुख्य चौकात शिवछत्रपती महाराजांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी आपण उभा केला पाहिजे हा संकल्प झाला.
कारण यापासून आपल्याला निरंतर प्रेरणा मिळाली पाहिजे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलाही वाटलं पाहिजे की, हा राजा माझा आहे. मराठी माणसाचा राजा आहे. छत्रपतींनी जे कार्य आपल्यासाठी करून ठेवलं ते महाराष्ट्रातच काय तर देशातही झालं नाही. त्या कार्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांचं स्मरण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हा पुतळा आपल्याला प्रेरणा देत आहे. या ठिकाणी अत्यंत भव्यदिव्य स्वरूपात हा कार्यक्रम शासनाने कार्यक्रम आयोजित केला. प्रत्येक जयंती याच पद्धतीने आपण केल्या पाहिजे. कारण ही जनजागृती केल्याशिवाय लोकांमध्ये त्यांचा आदर्श पोहचणार नाही. छत्रपतींचे विचार सर्वत्र पोहोचले पाहिजे. हाच विचार घेऊन ते उभे आहेत. त्यासोबतच देरकर यांनी अनेक विषयांवर प्रकाश टाकला.
वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची देदीप्यमान कारकीर्द प्रस्तुत केली. ते म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी संपूर्ण विश्वाला स्वराज्याचा आदर्श दिला. त्यांच्या राज्यात जनतेसोबतच स्त्रिया शेतकरी आणि सामान्य माणूस सुरक्षित होता. प्रगतीपथावर होता. आज छत्रपती शिवरायांच्या कार्याची नव्या समाज बांधणीसाठी गरज आहे. बोदकुरवार यांनी अनेक छोट्यामोठ्या दाखल्यांमधून छत्रपती शिवरायांचे विश्व उभे केले.
याप्रसंगी ख्यातनाम गायक तथा शिक्षक दिगंबर ठाकरे यांनी एक दमदार शिवगीत सादर केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक ७ चे विद्यार्थी सार्थक लाटकर आणि वैष्णवी बघेल या विद्यार्थ्यांनी समयोचित भाषणे केलीत. शिव आनंद लाठीकाठी गृपची तेजस्विनी गव्हाणे हिने शिवगर्जनेने छत्रपतींना मानाचा मुजरा केला. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण संचालन मुख्याध्यापक गजानन तु. कासावार यांनी केले. शिक्षक दिलीप कोरपेनवार यांनी उपस्थितांचे आभार मानलेत.
Comments are closed.