मंगळवारपासून वणीत सात दिवस छत्रपती महोत्सव
विवेक तोटेवार, वणी: स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपासून ते राजाराम महाराज यांच्या जयंतीपर्यंत तालुक्यात छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अजय धोबे यांनी शनिवारी विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ज्योतिबा फुले यांच्या पुढाकाराने सुरू झालेला शिवजयंती उत्सव आता संपूर्ण महाराष्ट्रात 19 फेब्रुवारीला मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. या अनुशंगाने संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ यांनी शिवजयंतीसोबतच राजाराम महाराज व गाडगे बाबा यांच्या कार्याचा प्रसार व प्रचार व्हावा याकरिता छत्रपती महोत्सवाचे आयोजन केले आले आहे.
छत्रपती महोत्सवाची सुरवात 19 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता मोटारसायकल व कार रॅलीचे होणार आहे. त्यानंतर 6 वाजता उदघाटन सोहळा शिवतीर्थावर पार पडणार आहे. छत्रपती महोत्सवाचे उदघाटन वरोरा भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकर करणार आहेत. उदघाटन प्रसंगी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राचे संघटक बालाजी जाधव हे संबोधित करणार आहेत.
बुधवारी 20 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता भालर व 21 फेब्रुवारीला निवली येथे विकास चिडे गुरुजी यांची विकासवाणी संपन्न होईल. तर 22 तारखेला मोहदा येथे दिलीप चौधरी यांचे व्याख्यान होणार आहे.
23 फेब्रुवारीला गाडगेबाबा जयंतीनिमित्त गुरुकुंज आश्रम मोझरीचे संचालक रवी मानव यांचे व्याख्यान आणि तुषार पोहिनकर व आकाश तावीडे या बाल कीर्तनकाराचे कीर्तन तालुक्यातील गणेशपूर येथे संपन्न होणार आहे. तर 24 फेब्रुवारीला राजाराम जयंतीनिमित्त याच व्यक्तींचे चिखलगाव येथे कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. 25 फेब्रुवारीला नायगाव येथे कार्यक्रम होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचा समारोप 26 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता नांदेपेरा येथे होणार आहे. या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. सदस्या चांद्रज्योति शेंडे उपस्थित राहणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमात जनतेने सहभाग घ्यावा अशी विनंती संभाजी ब्रिगेड , मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांच्याकडून करण्यात आली आहे.