शिवपुराण कथेत चोरट्यांची चांदी, लाखोंचा ऐवज लंपास

तक्रार करण्यासाठी महिलांची गर्दी, 9 महिलांची दागिने चोरी गेल्याची तक्रार

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी दिनांक 27 जानेवारी पासून परसोडा येथे शिवमहापुराण कथा सोहळा सुरू झाला आहे. या कथेसाठी लाखो भाविक आले आहेत. मात्र त्याच सोबत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरटे देखील सक्रीय झाले आहेत. शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसात काही महिलांचे दागिने चोरीला गेले. त्यामुळे रविवारी दागिने चोरी गेलेल्या महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीसाठी गर्दी केली होती. 8 महिलांचे सुमारे 15 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र हा ऐवज मोठा असल्याचे सांगण्यात येत असून अनेक महिलांनी तक्रार देण्याचे टाळल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या 9 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार झाली असली तरी हा आकडा मोठा असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

परसोडा येथे शनिवार पासून शिवमहापुराण कथेला प्रारंभ झाला. या कथेसाठी सुमारे एक ते सव्वा लाख भाविकांची उपस्थिती होती. वणी शहरासह जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही अनेक महिलांनी याठिकाणी हजेरी लावली. यासह मोठ्या प्रमाणात चोरटे देखील सक्रिय झाले आहेत. एकीकडे कथा सोहळा सुरू असताना यावेळी दसरीकडे चोरट्यांनी त्यांची दिवाळी साजरी केल्याचे दिसून आले.

शनिवारी दिवसभरात सुमारे 13 महिलांचे सोनसाखळी, मंगळसूत्र चोरीला गेले. आठ महिलांनी वणी पोलिस ठाण्यात मंगळसूत्र, सोनसाखळी चोरीस गेल्याची तक्रार नोंदविली आहे. एकूण 15 तोळे वजनाचे नऊ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातून लंपास केले आहेत. यामुळे सोनसाखळी चोरीस गेल्याने महिलांची चांगलीच धांदल उडाली आहे.

परराज्यातील टोळी सक्रिय ?
चोरीच्या तक्रारी प्राप्त होताच पोलिसांनी काही संशयीतांना ताब्यात घेतले. यातील अनेक महिला या हरियाणा, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश अशा परराज्यातील असल्याची माहिती आहे. मात्र या महिलांकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नसल्याची माहिती आहे. तसेच वणीतील चोरट्यांनाही ताब्यात घेतले. मात्र त्यांच्याकडून कोणताही सुगावा पोलिसांना लागला नाही.

आकडा वाढण्याची शक्यता
पोलिसांनी दागिन्यांच्या बिलाची मागणी केल्याने काही महिलांनी तक्रार देण्याचे टाळले. केवळ दोनच दिवसात लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याने कथा संपे पर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवपुराण कथेच्या प्रत्येक ठिकाणी लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याच्या घटना आधीच घडलेल्या आहेत. याबाबत आयोजकांकडूनही सावधानतेचा इशारा देण्यात येतो. मात्र त्यानंतर ही या घटना घडत असल्याचे चोरट्यांची चांगलीच चांदी होताना दिसत आहे.

Comments are closed.