आज गुंजणार शिवसेनेचा आवाज, वणीत गजगोटा मोर्चाचे आयोजन
अवैध धंदे आणि विविध मागण्यांसाठी शिवसेनेचा एल्गार
विवेक तोटेवार, वणी: वणी विधानसभा क्षेत्रात राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे बंद करावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आज वणी उपविभागीय कार्यालयावर गजगोटा मोर्चाचे आयोजन केले आहे. दुपारी 12 वाजता वणीतील टिळक चौकातून या मोर्चाला सुरूवात होणार आाहे. वणी शहरातील प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करून या मोर्चाचा टिळक चौकातच समारोप होणार आहे. मोर्चानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे. या मोर्चात वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील शिवसेनेचे सदस्य आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
शिरपूर, वणी, मारेगाव, झरी, मुकुटबन, पाटण पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू, जुगार, व्यवसाय त्वरित बंद करणे, शहरी आणि ग्रामीण भागातील शाळा व महाविद्यालयासमोर गांजा व अंमली पदार्थांची विक्री होत आहे. त्याला आळा बसविणे, कोळसा तस्करी बंद करणे, गुलाबी बोंडअळीमुळे सन २०१८-१९ या चालू हंगामात कापसाचे नुकसानभरपाई ही हेक्टरी १५ हजार रु. सरसकट देण्यात यावी.
सोयाबीन पिकावर करपा आल्यामुळे उत्पन्नात जी घट येणार असून, हेक्टरी १० हजार नुकसानभरपाई द्यावी, वाघ व अन्य जंगली श्वापदे अन्यत्र हलविणे, पेट्रोल, डिझेल, गॅस, इंधन दरवाढ तातडीने कमी करणे, शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती त्वरित करणे, शेतकऱ्याला सिंचनासाठी दिवसा विद्युत पुरवठा देणे, तूर, हरभरा, नाफेडने खरेदी केला त्याचे पैसे अजूनही देण्यात आले नाही ते त्वरित देण्यात यावे अशा मागण्या शिवसेनेने केल्या आहेत.
या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर, वणी विधानसभा संपर्कप्रमुख संतोष माहुरे, वणी उपविभागीय उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास, झरी जामणी तालुकाप्रमुख चंद्रकांत घुगूल, मारेगाव तालुकाप्रमुख संजय आवारी, शरद ठाकरे, वणी शहरप्रमुख राजू तुराणकर, मारेगाव शहरप्रमुख अभय चौधरी, झरी शहरप्रमुख संजय बिजगुणवार, माजी सभापती अनिल राजूरकर, उपतालुका प्रमुख बाळू सोमलकर यांनी केले आहे.