शिवसेना प्रणीत कामगार सेनेची जीआरएन कंपनीत कार्यकारिणी स्थापन शेकडो कामगारांनी घेतला कामगार सेनेत प्रवेश

आ. संजय देरकर यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेची (उबाठा) घोडदौड सुरूच

बहुगुणी डेस्क, वणी: – निलजई-बेलोरा-तरोडा परिसरात कार्यरत जीआरएन कंपनीत शिवसेना (उबाठा) प्रणीत कामगार सेनेची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. गुरुवारी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी आ. संजय देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व संजय निखाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. रमेश भादीकर यांची अध्यक्ष तर संजय जांभुळकर यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. जीआरएन ही परिसरातील नामांकित कंपनी असून या कंपनीत चालक, हेल्पर, मजूर, सुपरवायझर असे सुमारे हजार पेक्षा अधिक कामगार काम करतात. कामगार सेनेच्या कार्यकारिणीमुळे परिसरातील कामगार चळवळीला बळकटी मिळाली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची (उबाठा) घोडदौड सुरू असून आ. संजय देरकर यांच्या नेतृत्त्वात सध्या सर्व सेलच्या संघटनात्मक मजबुतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून जीआरएन कंपनीत कामगारांची मोट कामगार सेनेच्या माध्यमातून बांधण्यात आली आहे. कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून संदीप ढोके, कोषाध्यक्ष युगल घिमे, सहसचिव पदी सूरज सातनकर व राजू भोगेकर तर संघटक म्हणून महेंद्र राखुंडे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी कार्यकारिणी फलकाचे देखील अनावरण करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून आ. संजय देरकर यांनी कामगारांना मार्गदर्शन केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

एकत्र येऊन लढा देऊ – संजय देरकर
कामगार कंपनीसाठी राबराब राबतो. मात्र त्याचा योग्य तो मोबदला त्याला मिळत नाही. कामासाठी सुरक्षीत वातावरण नसते. सुरक्षेचा अभाव असल्याने अनेक अपघात होतात. कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळत नाही. आरोग्य सेवा मिळत नाही. यावर एकमेव उपाय म्हणजे कामगारांचे संघटन होय. या समस्या सोडवण्यासाठी सर्व कामगारांना एकत्र यावे लागेल. एकत्र येऊन लढा द्यावा लागेल.
– संजय देरकर, आमदार शिवसेना (उ.बा.ठा)

कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय निखाडे यांनी परिसरातील कामगारांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. तर संतोष कुचनकर यांनी शिवसेना नेहमी कामगारांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरेल अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाला शरद ठाकरे, लेकेश्वर बोबडे, टिकाराम खाडे, आयुष ठाकरे, दिवाकर भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कंपनीतील अनिल जांभुळकर, नितीन पखाले, उमेश्वर पाचभाई, राकेश घिमे, शंकर कोटनाके, संकेत भादीकर, मोरेश्वर पाचभाई, सूरज निब्रड, भारत खाडे, ओमप्रकाश सोनटक्के, चंदू बोर्डे, सुफेमयन कांबळे, महेंद्र बावने, रोशन सोनटक्के, नितीन भादीकर, दिलीप नवले, नितीन तुराणकर यासह शेकडोंची उपस्थिती होती.

Comments are closed.