मिनी इंडियाच्या मातीतील समाजदीप: महेश लिपटे ‘सर’

शिक्षणाच्या माध्यमातून घडलेले व्यक्तिमत्व

राजूर ही केवळ एक वस्ती नाही, तर विविधतेतून एकतेचा धडा शिकवणारे जिवंत उदाहरण आहे. या गावाची मातीच वेगळी — जणू संपूर्ण भारताची सांस्कृतिक मेजवानी येथे साकारली गेली आहे. होळी, दिवाळी, ईद, ख्रिसमस, गुरुपर्व… प्रत्येक सणात धर्म, जात, प्रांत यांच्या सीमारेषा वितळतात. म्हणूनच राजूरला ‘मिनी इंडिया’ ही उपमा प्राप्त झाली आहे — आणि ती फक्त नावापुरती नाही, तर व्यवहारात उतरलेली आहे. गावात विविध विचारसरणी — डावी, उजवी, आंबेडकरवादी — यांची उपस्थिती असली, तरी ओळख मात्र एकाच मूल्याशी जोडलेली आहे : समानता आणि सेक्युलरता ! 

अशा या मातीने अनेक गुणी व्यक्तिमत्वांना घडवले आहे. त्यापैकीच एक तेजस्वी, समर्पित आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणजे — महेश मनोहर लिपटे. ज्यांना स्थानिक राजूरवासी व परिसरातील रहिवासी ‘लिपटे सर’ म्हणून स्नेहाने ओळखतात. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा वारसा घेऊन त्यातूनच त्यांनी सामाजिक, राजकीय आणि शिक्षण क्षेत्रात आपली यशस्वी वाटचाल केली. त्यांचे जीवन हे राजूरच्या समानतेच्या मातीचे प्रतिबिंब आहे. 

महेश लिपटे सर यांचा अल्प परिचय…
महेश यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1989  रोजी राजूर येथील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. वडील मनोहर लिपटे हे वेकोलित नोकरीला आहे. नोकरीच्या निमित्ताने ते चंद्रपूर जिल्ह्यातून राजूर येथे स्थायिक झाले. गावातीलच जिल्हा परिषद शाळेत महेश यांचे प्राथमिक शिक्षण व राष्ट्री विद्यालयात माध्यमिक शिक्षण झाले. उच्च माध्यमिक त्यांनी वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शांती निकेतन महाविद्यालय नागपूर येथून डिएड (डि.टी.एड) केले. त्यानंतर त्यांनी बीए आणि एमए लोकमान्य टिळक महाविद्यालयातून पूर्ण केले. यासह डीप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट हा मुख्याध्यपकासाठी गरजेचा असलेला कोर्स चंद्रपूर येथून पूर्ण केला. आतापर्यंत त्यांनी मराठी, इंग्रजी व अर्थशास्त्र या विषयात पीजी केले असून सध्या त्यांचे बीएड सुरु आहे.

चळवळीशी नाते, समाजासाठी निष्ठा
राजूर गावातील जवळपास प्रत्येकाचाच संपर्क फुले शाहू आंबेडकरी चळवळीशी येतो. महेश यांचा देखील या चळवळीशी संपर्क आला. या चळवळीशी ते केवळ जुलले नाहीत तर विविध सामाजिक चळवळीचा ते एक सक्रीय भाग बनले. . समाजातील वंचित घटकांसाठी काम करणे, शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवणे आणि सेवा हे जीवनाचे ध्येय बनवणे — ही फुले-शाहू-आंबेडकरी परंपरेची खरी शिकवण त्यांनी आपल्या आचरणातून जगली आहे. वणी परिसरातून दर शुक्रवारी मेघे-सावंगी येथे रुग्ण रवानगी सेवा देणे, कोविड-१९ काळात समाजोपयोगी उपक्रम राबवणे, गरजूंच्या मदतीसाठी सदैव पुढे राहणे — हे सर्व त्यांच्या सेवाभावाचे द्योतक आहे.

महेश सरांची सामाजिक जाणीव केवळ काही उपक्रमांपुरती मर्यादित नाही, तर ती एक सततची चळवळ आहे. त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त राजूर, कॉलरी, इजारा, भांदेवाडा, निंबाळा, सोमनाळा, सोनापुर, पडसोनी, मुर्धोनी या गावांमध्ये ग्रामदिंडी, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, सामान्य ज्ञान परीक्षा, चित्रकला स्पर्धा आणि जिल्हा परिषद शाळांमधील शो-ड्रिल स्पर्धा आयोजित करून सामाजिक जागृतीचा ठसा उमटवला. संविधान दिनी ‘संविधान दौड’ आणि व्याख्यानमाला यांच्या माध्यमातून त्यांनी लोकशाही मूल्यांचा प्रसार केला, तर राजूर विकास संघर्ष समितीमार्फत दर शनिवारी महिला मंडळ हॉलमध्ये प्रसिद्ध व्याख्यात्यांची मार्गदर्शन शिबिरे घेऊन लोकांमध्ये विचारचर्चेची संस्कृती जिवंत ठेवली. 

गावाच्या विकासासाठी अथक प्रयत्न
लिपटे सरांचे कार्य केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित नाही. ते गावातील सर्वसामान्यांच्या समस्या समजून घेऊन प्रशासनापर्यंत पोहोचवतात, आणि त्यांचे निराकरण होईपर्यंत पाठपुरावा करतात. गावातील रस्ते, पाणी, आरोग्यसेवा, शिक्षण आणि रोजगार — या विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. गावाचा सर्वांगीण विकास हा त्यांचा ध्यास बनला आहे. आता पर्यंत असे विविध विषय उचलून ते सोडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

जनतेच्या हक्कांची लढाई आणि गावाचा सर्वांगीण विकास. त्यांच्या या कार्याने राजूर गावातच नव्हे, तर परिसरातही त्यांचे नाव आदराने घेतले जाते, जणू ते या गावाचा एक चमकणारा हिरा आहेत. आज राजूर परिसरात “लिपटे सर” हे नाव उच्चारले की लोक आदराने म्हणतात —“ते फक्त शिक्षक नाही, समाजाचे खरे सेवक आहे.” त्यांची समाजाप्रती असलेली तळ, कार्यतत्परता आणि नेतृत्वगुण हेच त्यांचे बलस्थान आहे. महेश लिपटे सर हे केवळ व्यक्ती नाहीत — ते एक विचार आहेत, एक प्रेरणा आहेत, आणि राजूर गावाच्या प्रगतीचा उज्ज्वल दीप आहेत.

महेश लिपटे यांचा आज वाढदिवस आहे. वणी बहुगुणीतर्फे त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा… (महेश लिपटे मो. 8657412389)

Comments are closed.