शिवसेनेचा (उबाठा) प्रभाग 2 मध्ये धुंवाधार प्रचार, वाजत गाजत निघाली रॅली
प्रभाग 2 मध्ये महाविकास आघाडीचे ज्योत्स्ना बालाजी धोटे, राजू किसन तुराणकर उमेदवार
बहुगुणी डेस्क, वणी: शुक्रवारी शिवसेनेच्या (उबाठा) प्रचाराची सुरुवात प्रभाग क्रमांक 2 मधून झाली. आमदार संजय देरकर यांच्या हस्ते प्रगती नगर येथील हनुमान मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. प्रभाग 2 चे शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीच्या उमेदवार ज्योत्स्ना बालाजी धोटे, राजू किसन तुराणकर व नगराध्यक्ष पदाच्या शिवसेना उबाठा व महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. संचिता नगराळे (गेडाम) यांच्या प्रचारार्थ आज प्रगतीनगर येथे भव्य जनसंवाद रॅली व गृहभेटीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला प्रभागातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रचार रॅलीचे स्वागत केले. शिवसेना, काँग्रेस व मनसे कार्यकर्त्यांची एकत्रित उपस्थिती, प्रचाराला वेगळेच रंग देत होती.
दु. 12 वा. प्रगतीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळील हनुमान मंदिर येथून दिवसाच्या प्रचाराला सुरुवात झाली. आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्त्वात ही प्रचार रॅली काढण्यात आली. बँड व पारंपरिक वाद्याच्या गजरात निघालेल्या या रॅलीने संपूर्ण प्रगती नगर, ढुमे नगरचा दौरा केला. यावेळी उमेदवार डॉ. संचिता नगराळे, ज्योत्स्ना धोटे व राजू तुराणकर यांनी गृहभेट घेत मतदारांशी संवाद साधला. कॉर्नर बैठकीत आमदार संजय देरकर, मनसे नेते राजू उंबरकर व शिवसेनेतील मान्यवर नेत्यांनी आपले मनोगत मांडत उमेदवारांना मोठ्या मतधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.

प्रभागातील सर्व समस्या सोडवणार
प्रभागातील नागरिकांना सर्वात मोठी समस्या म्हणजे ड्रेनेज सिस्टिमची आहे. अनेक ठिकाणी अंडरग्राऊंड नाली नसल्याने सांडपाणी रिकाम्या प्लॉटवर साचते आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. मुलांना खेळण्यासाठी जागा नाही, हे पाहून मन खिन्न होते. त्यामुळे ड्रेनेज सिस्टिम सुधारणे व नवी व्यवस्था उभारणे हा आमच्या अजेंड्यातील पहिला मुद्दा आहे. त्याचबरोबर नवीन वस्तीतील रस्त्यांच्या समस्या दूर करून, ओपन स्पेसवर बाग व ओपन जीम तयार करून नागरिकांना आरोग्यदायी वातावरण देण्याचा आमचा निर्धार आहे. – राजू तुराणकर, उमेदवार
या रॅलीत शिवसेनेचे संजय निखाडे, संतोष कुचणकर, किरण देरकर, विनोद ढुमणे, जगन जुनगरी यांच्यासह प्रभागातील शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग 2 मध्ये प्रगतीनगर, ढुमे नगर, जनता शाळेजवळील परिसर, यासह भोंगळे ले आऊट इत्यादी नवीन वस्तींचा समावेश आहे.



Comments are closed.