तहसील कार्यालयासमोरील दुकानाला लागली भीषण आग

तीन दुकाने जळून खाक, फुटपाथ व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी मध्यरात्री वणी तहसील कार्यालयासमोरील फुटपाथ वरील तीन दुकाने आगीच्या भक्षस्थानी सापडले. पहाटे ही घटना उघडकीस आली. सकाळी अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यत तीन दुकानातील संपूर्ण माल जळून खाक झाला होता. या घटनेत व्यापाऱ्यांचे सुमारे 7 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे..

वणी तहसील कार्यालयासमोरील फुटपाथवर अनेक व्यापारी व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. यामध्ये कापड, चप्पल जोडे, फळविक्रेते आहेत. तहसील कार्यालयासमोरील फुटपाथवरील दुकान मालक 15 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले. पहाटे 5 वाजताच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जाणा-या काही लोकांना तहसील कार्यालयासमोरील दुकानाल आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती त्वरित पोलीस प्रशासनाला दिली. माहिती मिळताच अग्निशामन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सकाळी 9 वाजेपर्यंत आग विझवण्यात यश आले, मात्र तोपर्यंत तीन दुकानातील संपूर्ण माल जळून खाक झाला होता.

या दर्घटनेत शेख एजाज शेख महेबूब यांचे चप्पलच्या दुकानातील संपूर्ण माल जळाला. 15 दिवसांपूर्वी एजाज यांनी दसरा व दिवाळीसाठी माल भरला होता. या आगीत त्यांचे सुमारे 2 ते 2.5 लाखांचे नुकसान झाले आहे. एजाज यांच्यावर रंगनाथ स्वामी बँकेचे 1.50 लाख रुपयांचे कर्ज असल्याची महिती आहे. त्यामुळे आता काय करावे हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आहे.

एजाज यांच्या दुकानाच्या बाजूला अरुण ढेंगळे यांचे घड्याळ विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. त्यांचे जवळपास 50 हजारांचे नुकसान झाले आहे. त्यांच्याही दुकानातील माल पूर्णपणे जळून खाक झाला आहे. यांच्या दुकानाला लागून संतोष चिकट यांचे बेल्ट, गॉगल, पॉकेट याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानातील संपूर्ण वस्तू जाळल्या आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच दसरा दिवाळीसाठी दुकानात माल भरला होता. त्यांचे जवळपास 2 ते 2.50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पावसाने केला घात?
शुक्रवारी मध्यरात्री शहरात पाऊस झाला. पावसामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. जर अग्निशामन दलाने वेळेवर पोहोचून आग आटोक्यात आणली नसती तर आगीच्या भक्षस्थानी आणखी दुकाने आली असती. अग्निशामक दलाचे चालक देविदास जाधव, शाम तांबे, दीपक वाघमारे यांनी आग विझवण्यास मदत केली. या दुर्घटनेत व्यापा-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

हे देखील वाचा:

मातोश्री ट्रेडर्सची 3 वर्षांची यशस्वी घोडदौड पूर्ण

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘दसरा धमाका’ ऑफर लॉन्च

मयूर मार्केटिंगमध्ये दस-यानिमित्त महासेल

Comments are closed.