जगद्गुरू संत तुकोबारायांचे नाव वापरणाऱ्या बिडी कंपनीवर बंदी घाला
श्री गुरुदेव सेनेची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जब्बार चिनी, वणी: निझामाबाद येथील एका बिडी उद्याेगाने वारकरी संत जगतगुरु तुकोबारायांचे नाव दिले. त्यामुळे वारकरी व महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्यात. सदर उद्याेगचालकावर सक्त कारवाई करावी. त्यावर कायमस्वरूपी बंदी घालावी. अशा मागणीचे निवेदन श्री गुरुदेव सेनेने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना पाठवले.
वारकरी पंथाचा कळस झालेले संत जगद्गुरु तुकोबाराय यांनी संपूर्ण आयुष्य समाजातील वाईट रुढ्या-परंपरा , अंधश्रद्धा दूर करण्यासाठी वेचलं. जागृती करून समाजाला सात्विक मार्ग दाखवला. असे असताना त्यांनी आपल्या आयुष्यात सर्व सद्गुण बाळगलेत. त्यावर प्रत्यक्ष काम केलं. महान संताच्या नावाने निझामाबाद येथील झुमरलाल गोरधन या व्यावसायिकाने संत तुकोबारायांची प्रतिमा व नाव देऊन बिडीचा उद्योग सुरू केला. यामुळे तमाम संतप्रेमी व वारकरी समाजाच्या प्रचंड भावना दुखावल्यात.
सदर उद्याेगचालक व कंपनीचा शोध घेऊन त्यांच्यावर सक्त कारवाई करावी. या उद्याेगावर बंदी घालावी ही मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी श्री गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर, मुख्य संघटक मिलिंद पाटील, भवानी मांडाळे, पुंडलिकराव मोहितकर,निखिल झाडे, अमोल गुरुनुले आदी उपस्थित होते.