श्री, सौ. आणि…..

सुनील इंदुवामन ठाकरे

0

सुनील इंदुवामन ठाकरे : 

अलीकडच्या काळात मी कुणाच्या नावामागे ‘श्री’ वगैरे लावत नाही. माननीयचा शॉर्टफॉर्म ‘मा.’ असंच लिहितो. या ‘श्री’ व ‘सौ.’ मागे मला प्रचंड भेदाची दरी दिसते. यातून पुरुषी अहंकार जोपासला जातो, असं माझं व्यक्तिगत मत आहे. या देशाला मातृसत्ताक व्यवस्थेची फार प्राचीन परंपरा आहे. महाकाव्यांतदेखील त्याची वणने आली आहेत. मुलाला बापाचं नाव लावण्याचीदेखील गरज नव्हती. त्याची आई हीच त्याची ओळख असायची. कुंतीचा पुत्र कौंतेय, राधेचा पुत्र राधेय, गंगेचा पुत्र गांगेय किंवा गंगापुत्र, दनूचा पुत्र दानव ही ओळख पुरेशी असायची.

पुरूषी सत्तेचे प्राबल्य वाढल्यापासून ही स्त्रियांची ओळख कमी करण्याचे षडयंत्र सुरू झाले. निर्ऋती ही आद्य गणनायिका होती. शबरी, शूर्पणखा अशा अनेक नायिकांचा उल्लेख कॉ. शरद पाटील यांनी केला आहे. यांची स्वतंत्र राज्ये होती. या स्त्रिया संपूर्ण राज्यव्यवस्था स्वबळावर सांभाळत असल्याची अनेक कथा व काव्यांतून वर्णने आली आहेत.

‘श्री’ हे संबोधन संपन्नतेचं आहे. अर्थात हे पुरुषांसाठीच वापरतात. म्हणजे पुरुष हा सर्वार्थाने संपन्न आणि परिपूर्ण समजावा असं सूचित केलं जातं. स्त्रियांसाठी श्रीमती हे संबोधन वापरतात. पण जिची ‘मती’च संपन्न आहे अशी ती समजावी. बरं त्यातही विधवा स्त्रियांसाठी म्हणजे जिचा नवरा मेला असेल अशा स्त्रीसाठी श्रीमती या संबोधनाचा उपयोग मराठी प्रांतात मोठ्या प्रमाणावर होतो. स्त्रिया सर्वच क्षेत्रांत जरी संपन्न असल्या तरी त्यांना ‘श्री’ लावलं जात नाही. लावावं असा माझा कुठलाच आग्रहदेखील नाही. तर पुरुष हा लिंगाधारानेच श्रेष्ठ हे सातत्याने बिंबविण्याचा प्रयत्न असतो.

स्त्रिया या सर्वांगाने पुरुषांवर डिपेंड असतो. मनुस्मृती की कुठल्यातरी ग्रंथात म्हटलं आहे, की लहान असताना स्त्रीने बापाच्या आधाराने, तारूण्यात नवऱ्याच्या आधाराने व म्हातारपणात मुलाच्या आधाराने राहावं. बरं हीचं लक-अनलक म्हणजेच सर्व भाग्य पुरुषांवरच आधारित असतं. जी उपवधू असते, तिचं नावापुढे चि.सौ.कां. असं लिहिल्याचं आपण लग्नपत्रिकेतन नेहमी बघतो. चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी असं लिहिलं असतं. लाँगलाईफ उत्तम भाग्याची अपेक्षा करणारी असा त्याचा अर्थ निघत असावा कदाचित. बरं या ‘‘कुमारी’’चं भाग्य कसं सौभाग्य होईल, तर तिला नवरा मिळाल्यावर होईल असं आपलं रुटीन जगणं सांगतं. गळ्यात मंगळसूत्र बांधलं की झाली ती सौभाग्यवती. तीचं भाग्य जसं काही परिपूर्ण फळाला येतं. ती उत्तम भाग्याच्या परमोच्च शिखरावरच जणू जाते. बरं तिचं हे भाग्य तिचं पर्सनल कुठे असतं.

तिचा नवरा जिवंत असणं हेच तिचं भाग्य असतं. हा नवरा कसाही असला तरी, तो तिचं दैवत, भाग्य, सौभाग्य असतं. सौ. लावताना तिची स्वतःची ओळख जाते. बरं टिप्पिकल पुरुषदेखील आपल्या बायकोचा परिचय करून देताना ‘‘ह्या ‘‘सौ’’ आमच्या’’ असाच करून देतात. म्हणते ती विवाहिता जी काही असेल ती त्या पुरुषाच्याच बळावर आहे असा सांगण्याचा अट्टाहास असतो. बरं हा नवरा मेला की तिचा सौ.देखील निघतो आणि तिचं भाग्यदेखील निघतं.

आता काळ बऱ्यापैकी सुधारला आहे. मिस्टर आणि मिसेसचं फॅड आलं. बरं यातही पुरुषी अहंकार आहे. बरं हा मिस्टर डबडू असेल तर त्याची बायको ही मिसेस डबडूच असते. मिसेस लावलं तरी नवÚयाच्याच नावाची ओळख तिला चिकटवली जाते. ‘डबडू’ हे नाव उदाहरणासाठीच घेतलं. असं कुणाचं नाव वगैरे नसतं. बरं ही सौभाग्याची सगळी लक्षणे बायकांनीच मेंटेन करायची असतात. मंगळसूत्र, जोडवे आणखी काय काय. सौभाग्याचं लेणं वगैरेदेखील काही आयटम्स असतात.

कुणाला काय संबोधावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण माझी ‘‘श्री’’ व ‘‘सौ.’’ असं संबोधन लावण्याची सवय मी मोडलीच. जाती, धर्म, पंथ, संस्था, समूह, वर्ग, त्यांनी मिळविलेल्या पदव्या याप्रमाणे ही  संबोधने बदलातात. याही उपर या त्यांच्या पदव्यांपुढे श्री व सौ. लावणारेदेखील भरपूर आहेत. सांगायचं झाल्यास, डॉ. सौ. ……………., इंजि. सौ……………, अॅड. सौ…….., प्रा. सौ………, आर्कि……..सौ. इत्यादी. जर आपण सगळेच मनुष्यप्राणी आहोत,

तर मग हा भाषक खेळ व भेद कशासाठी! देहातला फरक हा कुणालाच लहान-मोठा ठरवू शकत नाही. निसर्गनियमांनी चालणारे मनुष्य वगळता कोणतेच प्राणी भेद करीत नाहीत. जगद्गुरू तुकोबारांयांनी म्हटलंय, ‘‘विष्णूमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’’ आपण कोण लागून गेलो हा भेद करणारे, जेव्हा निसर्गानेच आपल्यासोबत केला नाही.

सुनील इंदुवामन ठाकरे

8623053787

9049337606

Leave A Reply

Your email address will not be published.