शाळा डिजिटल व स्मार्ट झाल्यात; परंतु विद्यार्थी स्मार्ट कधी होतील?
शिक्षणाच्या आधुनिकीकरणासोबतच त्याची काळी बाजू मांडणारा चिंतनीय लेख
प्रा. सागर दे. जाधव, वणी: आजच्या हायटेक युगात आपण जगत आहोत. चंद्र-मंगळादींचीही सफर करून आलोत. साध्या पोस्टकार्डावरून होणारं संभाषण आता कुठच्या कुठं गेलं. सर्व काही डिजिटल आणि स्मार्ट होत आहे. मात्र विद्यार्थी कधी ‘स्मार्ट’ होतील? हा प्रश्न अद्यापही कायम आहे. एक शिक्षक म्हणून नेहमीच विद्यार्थ्यांशी संपर्कात येतो. वेगवेगळ्या शाळांमध्ये व्यक्तिमत्व विकास शिबिरे घेतलीत. जवळपास 70 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सेमिनारच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.फेस रीडिंग व मानसशास्त्राचा अभ्यास असल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समजणं फार सोपं जातं. तसेच सेमिनार घेत असताना बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात आल्यात, त्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडणार आहे.

बऱ्याच विद्यार्थ्यांना आजही चौथीपासून तर पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना साधं मराठी आणि इंग्रजी वाचता किंवा लिहता येत नाही. स्वतःचा परिचयसुद्धा आत्मविश्वासाने देता येत नाही. ही परिस्थिती फार गंभीर आहेत. भविष्यात त्यांचं काय होईल? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. फक्त शिक्षणाच्या बाबतीतच नाही, तर ते विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाबतीतही सरकार, पालक किंवा विद्यार्थी स्वतः उदासीन असल्याचं दिसून येतं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा जर विचार केला, तर आजही शिक्षणासोबतच सुदृढ शरीराचं महत्त्व पटवून देण्यामध्ये आपलं सरकार अपयशी ठरलेलं दिसून येतं. तशा अभ्यासक्रमाचा समावेशसुद्धा शिक्षणामध्ये दिसत नाही.
शारीरिक शिक्षणाचे शिक्षक विद्यार्थ्यांना बाहेर खेळायला पाठवतात. माग वेळ मारायला ते शिक्षकांशी गप्पा मारत बसतात. 21 जूनला योगदिवस मोठ्या थाटामाट्यात घेण्यात येतो. परंतु एकच दिवस योगासन आणि बाकी दिवस झोपा असंच काही चित्र भारतामध्ये असल्याचे दिसून येतं. याला काही अपवाद नक्कीच आहेत. मला असं वाटतं की, रोजच योगा शाळा-कॉलेजेसमध्ये झाला पाहिजे. मग तो अर्धा तास का असेना, परंतु शाळेमध्ये योगा कंपल्सरी केलं पाहिजे.
.
सरकारने जर प्रामुख्याने शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले नाही तर भविष्यात भारत कधीही महासत्ता होऊ शकणार नाही. उलट मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेल. गुन्हेगारी प्रवृत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यात तिळमात्र शंका नाही. आज विद्यार्थ्यांमध्ये शिस्त राहिली नाही. शिक्षकांनी धाक दिला तरीही बरेच विद्यार्थी त्यांचं ऐकत नाहीत. पालकांनी धाक दिला, तर बरेच विद्यार्थी घर सोडून जाण्याच्या धमक्या देतात अथवा प्रयत्न करतात. आपल्या पालकांच्या अंगावर धावून येतात. मुलांना लवकर राग येण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. म्हणजे त्यांना थोडं जरी काही म्हटलं, तरी लगेच राग येतो. परंतु मुलं ही गोष्ट समजून घेत नाहीत की, आपले पालक किंवा आपले शिक्षक आपल्या चांगल्यासाठीच आपल्याला रागवतात.
बऱ्याच शाळांना भेट दिल्यानंतर गुंड प्रवृत्तीची विद्यार्थी आढळून आलेत. त्यामुळे त्यांच्या संगतीत राहणारे हुशार आणि संस्कारी विद्यार्थीसुद्धा अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना करीत आहेत. जे सर्वसाधारण कुटुंबामधून आलेले विद्यार्थी आहेत, जे गरीब शेतकरी, मजुरांची मुलं आहेत त्यांच्यासाठीदेखील काहीच करता येत नाही. शिक्षकांचे हात बांधलेले असल्यामुळे अजून गुंड प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आज माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांनासुद्धा शिक्षकांचा धाक राहिलेला नाही.
उलट शिक्षकच विद्यार्थ्यांच्या धाकात असतात. बरेच शिक्षकही विद्यार्थ्यांना समजवण्यास किंवा त्यांना समजून घेण्यात असमर्थ आहेत. असेही दिसून येते की, काही विद्यार्थ्यांकडे ना त्यांच्या पाल्यांचे लक्ष असतं, ना विद्यार्थ्यांचं स्वतःकडे, ना शिक्षकांचं. काही अपवाद प्रत्येक गोष्टीला आहेत. तसेच बरेच विद्यार्थी हे जिल्हा परिषद किंवा साधारण शाळेमधूनसुद्धा अधिकारी झालेले आहेत. चांगल्या पदावर काम करत आहेत. बिजनेसमॅन झालेले आहेत. परंतु त्यांचे प्रमाण फार कमी आहे.
काही खाजगी शाळेवर विद्यर्थ्यांचा होणारा खर्च अवाढव्य आहे. साधारणतः प्रत्येक शाळेचे शुल्क वेगवेगळे आहे. काही शाळेचे वार्षिक सात लाख, तर काही शाळांचे यापेक्षा काही प्रमाणात कमी-जास्त आहेत. परंतु एवढा खर्च साधारण पालकांना झेपत नाही. किंवा ज्या पालकांचे हातावर पोट असतं, ते पालक आपल्या मुलांना इतक्या मोठ्या शाळेमध्ये टाकू शकत नाही. गरिबांना मोफत शिक्षण हा कायदा आहे. तरी दर्जेदार शिक्षण आणि सुविधेच्या अंमलबजावणीत सरकार अपयशी ठरल्याचं दिसून येतं.
एका महत्त्वाची गोष्टसुद्धा सहज निदर्शनास येते. ती म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यासच करावासा वाटत नाही. कोरोना काळामुळे यामध्ये भर पडलेली दिसून येते. विषयामध्ये आवड निर्माण होण्याच्या काही पद्धती असतात. जसं एखाद्या विषयाला वेळ द्यावा. तो विषय चांगला समजून सांगितला किंवा समजून घेतला तर तो समजतो. त्यानंतर त्या विषयांमध्ये आवड निर्माण होतो. विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो. अजून अभ्यास करावासा वाटतो. परंतु बरेच विषय जर समजलेच नाहीत, तर ते कंटाळवाणे वाटतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही अभ्यास करावासा वाटत नाही. त्यामुळे अभ्यास करताना आळस येतो. झोप लागते किंवा विद्यार्थी दुर्लक्ष करताना दिसतात.
अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. बरेच विद्यार्थी शाळेत जातात. मस्त्या करतात. घरी येतात. दिवसभर खेळतात. असंच काही समीकरण सर्वच विद्यार्थ्यांमध्ये असल्याचं दिसून येतं. मग त्या विद्यार्थ्यांकडे ना शिक्षकांचं ना पालकांचं लक्ष असतं. अशा विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळण्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे.
काही शिक्षक प्रामाणिकपणे शिकवतात. विद्यार्थ्यांना नीट समजून सांगण्याचे प्रयत्न करतात.आधीचे काही शिक्षक शिकवण्याबरोबर विद्यार्थ्यांच्या जीवनाला कसा आकार देता येईल यासाठी प्रयत्न करत होते. परंतु बरेचसे आजचे काही शिक्षक फक्त शिकविण्याचे काम करतात. जीवनाला आकार देण्याचे काम करताना दिसून येत नाही. काही शिक्षक प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना प्रसाद देतात. त्यांचं जीवन चांगलं बनवण्यासाठी प्रयत्न करतात. अशा सर्व शिक्षकांचं अभिनंदनही करावसं वाटतं.
फेब्रुवारी 2025मध्ये मी मुंबईला गेलो होतो. तिथे जहांगीर आर्ट गॅलरीच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम आहे. ते बघण्याकरिता गेलो असता तिथे शाळेची ट्रिपसुद्धा आली होती. सहजच मी दोन मुलांशी बोलणं सुरू केलं. मी त्यांना विचारलं की, तुम्ही कोणत्या वर्गामध्ये आहात? त्यांनी मला उत्तर दिलं की ते इयत्ता सातवीमध्ये शिकतात.
त्यानंतर मी त्यांना दुसराही प्रश्न असा विचारला, की तुमच्या शाळेची फीज किती आहे? त्यांनी मला सांगितलं की, त्यांच्या शाळेची वार्षिक फीज 3 लाख रुपये आहे. हे मी ऐकून अत्यंत दंग झालो. परंतु दुसऱ्या बाबतीत जर विचार केला, तर ती मुलं मला हुशार दिसत होती. आणि जेव्हा मी एक क्षण ऑब्झर्वेशन केलं तर ती मुलं हुशार होतीच. असं माझ्या लक्षात आलं.
,
चांगल्या शाळा, चांगलं अनुशासन फक्त मोठ्या शाळांमध्येच असताना दिसून येतं. (काही अपवाद वगळता) तिथे शिकण्याचा अधिकार फक्त आणि फक्त श्रीमंतांना राहिलेला आहे. भविष्यात मला असं वाटतं की, ज्यांच्याकडे असेल पैसा, त्यांनाच मिळेल गुणवत्ता. असंच समीकरण भविष्यात दिसेल.
सामान्य शाळेतील एखादा जरी विद्यार्थी अधिकारी झाला, तर त्याची वाहवा केली जाते. परंतु असे कितीतरी हजारों, लाखो विद्यार्थी आहेत, ज्यांचं आजही काय झालं? हे माहिती नाही. आयआयटी, एमबीबीएस अशा कित्येक चांगल्या परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांकडून मोठ्या शाळांत करून घेतली जाते. त्यासाठी त्यांना पैसा मोजावा लागतो.
परंतु सामान्य विद्यार्थ्यांचं काय? त्यांना तर आयआयटी, एमबीबीएस किंवा जे काही मोठी क्षेत्रं आहेत, बारावीनंतर माहिती होतं की, असं काहीतरी असतं. तेव्हा मात्र वेळ गेलेली असते. एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी जेव्हा अभ्यासात प्रगती दाखवत असते, तेव्हा त्यामागे प्रामुख्याने चार गोष्टी महत्त्वाचे असतात. त्या गोष्टी म्हणजे एक स्वतः विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी, पालक, शिक्षक आणि आजूबाजूचा परिसर.
एक गोष्ट सरकारनं किंवा प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं आहे. आजचे विद्यार्थीच हे उद्याचं भविष्य असणार आहेत. जर खऱ्या अर्थानं भारताचं भविष्य घडवायचं असेल, तर या विद्यार्थ्यांना समजून घेतलं पाहिजे. त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. जर असं झालं नाही, तर भारतामध्ये गुंडगिरी किंवा बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढेल. या सर्वांना सांभाळणे कठीण जाईल.
बऱ्याच मिडल क्लास किंवा गरीब परिवारांचा विचार केला तर एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे विद्यार्थी शाळेत किंवा नॉर्मली ट्युशनला जाणं यातच समाधान मानतात. नवीन नवीन गोष्टी शिकण्याकरिता किंवा व्यक्तिमत्व विकास होण्याकरिता त्यांचा व त्यांच्या पालकांचा कल असलेला दिसून येत नाही. सोबतच दुसऱ्या बाजुला बरेचशे श्रीमंत पालक असे आहेत, श्रीमंत म्हणजे विचारांनी आणि पैशांनीही. ते श्रीमंत पालक मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे काटेकोरपणे लक्ष देतात.
पीएमश्री शाळा योजनेच्या धर्तीवर सीएमश्री शाळा योजना राज्यात लागू केली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक आदर्श शाळा केली जाईल. या शाळांमध्ये डिजिटल सुविधा, ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडा विभाग यांसह सर्व सुविधांचा समावेश असेल. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. ह्या निर्णयाचं मी स्वतः स्वागत करतो. परंतु हे लागू करणं आणि प्रत्यक्षात आणणं यामध्ये मोठा फरक असल्याचं दिसून येतं. सोबतच बऱ्याचशा शाळांमध्ये मी गेलो तेव्हा तिथं साधारण मुलांसाठी प्रसाधनगृहही नाही. बऱ्याचश्या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख नाही. आधी सरकारनं याकडेही लक्ष दिलं पाहिजे असं मला मनातून वाटतं.
भारत हा शेती प्रधान देश आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची मुलं ही शहरात शिकतात किंवा गावातच शकतात. आई-वडिलांना जरी काही समजत नसलं, तरीही स्वतः चटणी भाकर करून आपला मुलगा चांगला शिकला पाहिजे, असं त्यांना वाटत असतं. परंतु खरंच त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे काय? सध्याची परिस्थिती पैसा म्हणजेच चांगलं शिक्षण हीच झालेली आहे.
बऱ्याच मोठ्या दर्जेदार शाळांतल्या मुलांची तुलना जर आपण साधारण शाळेतल्या मुलांशी केली तर त्यांच्या ग्रास्पिंग लेव्हलचा जर विचार केला, तर साधारण शाळेतली मुलं कुठेही टिकणार नाहीत. असंच काही दिसून येतं आणि ही दरी इतकी मोठी आहे की गरीबी आणि श्रीमंतीत भेद निर्माण करणारी आहेत.
Comments are closed.