सोशल मीडियावर इमोजीचा पगडा

भावनांच्या अभिव्यक्तीसाठी इमोजीचा वापर

0

विलास ताजणे, वणी: माहिती आणि तंत्रज्ञान युगात सर्वत्र सोशल मीडियाचा वापर वाढल्याचे दिसून येते. पूर्वी भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचा वापर केला जात असे. मात्र, सोशल मीडियाचा प्रभाव असलेल्या सध्याच्या काळात लहान मोठ्यांसह सध्याची तरुणाई प्रसंगानुरूप आपल्या भावनांचे आणि क्रियांचे वर्णन करण्यासाठी इमोजीचा वापर करताना दिसतात. परिणामी सोशल मीडियावर शब्दांऐवजी इमोजीची धमाल पहावयास मिळते.

पूर्वी आबालवृद्ध आपल्या वेगवेगळ्या भावना किंवा क्रियांचे प्रदर्शन करण्यासाठी उद्दगारवाचक शब्दांसह अन्य शब्दांचा वापर करीत होते. मात्र, सध्याच्या काळात मोबाईलद्वारा फेसबुक, व्हाट्सएपवर आपल्या भावना व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम म्हणून हसणाऱ्या, दुःखी, प्रेमळ आदी इमोजीचा वापर केला जातो. संवाद साधताना अनेकांच्या चॅटींगचा शेवटसुद्धा एखाद्या समर्पक अशा इमोजीने केला जातो.

आजकाल छोटी छोटी वाक्य किंवा शब्द वापरून संवाद साधला जातो. त्यात इमोजींचा वापर असल्यामुळे पूर्णविरामाच्या चिन्हाची गरज पडत नसल्याचे दिसून येते. आज जगभरातील विविध देशांतील लोक आपापल्या भाषेत संवाद साधत असले तरीही इमोजीच्या वापरात साम्य दिसून येते. भावनांच्या प्रदर्शनासाठी वापरल्या जाणारे इमोजी सारख्याच प्रकारचे असल्याचे स्पष्ट होते. सोशल मीडियावर शब्दांऐवजी इमोजीचा होणारा वापर पाहता इमोजी ही जागतिक भाषा झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

आपल्याला शब्दांत जे सांगता येत नाही त्यासाठी इमोजी फार उपयुक्त ठरतात. आनंद, दुःख, समाधान, वेदना आदी भावना शब्दांऐवजी इमोजीच्या माध्यमातून लवकर कळतात. अर्थातच वाक्यरचना करून व्यक्त केलेल्या आपल्या भावनांपेक्षा इमोजीचा अर्थ मेंदूला त्वरित कळतो. सध्या वापरात असलेल्या इमोजी फक्त भावना व्यक्त करतात. तथापि, भविष्यात बोलक्या इमोजी (भावमुद्रा) आल्यास नवल वाटायला नको. सर्वप्रथम जपानमध्ये १९९९ मध्ये इमोजीचा वापर सुरू झाला. पाहता पाहता अवघ्या दोन दशकांत अख्या जगाला इमोजीचं वेड लागलं.

Leave A Reply

Your email address will not be published.