सुशील ओझा, झरी:- तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या मुकुटबन ग्रामपंचायतीने गावातील अंधार दूर करण्याकरिता विशेष लक्ष देऊन २४ हजार रुपयाचा एक लाईट असे सौरऊर्जाचे लाईट्स संपूर्ण गावतील मुख्य ठिकाणी लावले. परंतु गावात लावण्यात आलेल्या सौरऊर्जा लाईटचे बॅटरी चोरट्याने लंपास केली ज्यामुळे ग्रामपंचायतीचे ३० हजाराचे नुकसान होऊन गावकऱ्यांना रात्रीच्या वेळेस अंधाराचा सामना करावा लागत आहे.
सर्वांचे लक्ष असलेल्या भर चौकातील बसस्टँडवरील सौर ऊर्जेच्या लाईटची बॅटरी दोन दिवसांपूर्वी चोरट्याने चोरून नेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गावात रात्रभर गुरखा फिरतो. पोलीस गस्तसुद्धा असून बॅटरीची चोरी झाली आहे ज्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी मुकुटबन गावातीलच दोन सौर ऊर्जेच्या बॅटरी चोरी झाल्या. त्याचा अजूनही ग्रामपंचायतीला पत्ता लागला नाही. तर पिंपरड, मांगली, अर्धवन, राजूर या गावातीलही सौरऊर्जेच्या बॅटरी चोरी गेल्या. याबाबत ग्रामपंचायत सचिवांनी पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या. परंतु अजूनही बॅटरी चोरट्याचा सुगावा लागला नाही. तालुक्यात इलेक्ट्रिक केबल चोरी, बॅटरी चोरी, भंगार चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे.
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत ला दलित वस्तीमध्ये लावण्याकरिता सौरऊर्जेचे लाईट उपलब्ध झाले होते. त्या सौरऊर्जेच्या बॅटरी चोरी गेल्याने शासनाचा लाखो रुपयांचा नुकसान झाला आहे तरी पोलिसांनी सदर तक्रारीच्या कसून चौकशी करून आरोपीला पकडून कोठडीत घालावे अशी मागणी ग्रामपंचायत सरपंचांकडून होत आहे.