देशसेवेसाठी जाणा-या मित्राला भावपूर्ण निरोप

'भारत माता की जय' या जयघोषाने गुंजला परिसर

0

बहुगुणी डेस्क, वणी: भारतमाता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी एकता नगर परिसर दणाणून गेला होता. हार घातलेले दोन तरुण आणि त्यांच्या सोबत काही तरुण थाटात रस्त्याने जात होते. रस्त्यावरून जाणा-या सर्वांच्याच नजरा त्याकडे रोखल्या गेल्या होत्या. शेवटी नागपूरला जाणारी ट्रॅव्हल्स निघतांना या सर्व तरुणांनी दोन तरुणांना खांद्यावर उचलले आणि लहू किसन जिंदाबाद अशा घोषणा केल्या. हे दोन तरुण आहेत लहू धांडे आणि किसन बोढाले. सुट्टीनंतर देशाच्या रक्षणासाठी परत जाणा-या या जवानांना निरोप देण्यासाठी ते सर्व मित्र एकत्र आले होते.

चार पाच वर्षांआधी लहू धांडे हा कळमणा येथील तरुण व किसन बोढाले हा बोपापूर येथील तरुण हे आर्मीमध्ये भरती झाले. सध्या लहू जम्मू येथे कार्यरत आहे. तर किसन छत्तीसगड येथे. सप्टेंबर महिन्यात ते एक महिन्यांची सुट्टी काढून त्यांच्या गावी परत आले होते. हा संपूर्ण महिना कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासाठी होता. अखेर पाहता पाहता सुट्टी कशी संपली हे कळलेच नाही. परत निघण्याची वेळ जवळ आली. रात्री ट्रेन असल्याने लहू आणि किसन यांना नागपूर गाठायचे होते. त्यासाठी संध्याकाळी पाचच्या सुमारास ते एकता नगर परिसरात आले.

एकता नगर परिसरात मित्र आधीच निरोप देण्यासाठी तयार होते. सुमारे 50 मिंत्रांचा गोतावळा तिथे जमला होता. आता पुन्हा कधी भेट होईल याची या मित्रांनाही कल्पना नव्हती. लहू आणि किसन या दोघांनाही मित्रांनी हार घातले. बाजुच्या हॉटेलमधून जिलेबी आणून सर्वांनी तोंड गोड केले. गप्पा टप्पा रंगल्या. कधी परत येणार याविषयी विचारणा झाली. पुढल्या वेळी हे करू ते करू याचे प्लानिंग झाले. मात्र परत जाण्याची वेळ आली होती.

मित्रांनी त्यांच्या बॅग घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत हे सर्व ट्रॅव्हल्सकडे निघाले. वणी बहुगुणीशी बोलताना लहू आणि किसन भावूक झाले होते. दर वेळे मित्र असेच निरोप देतात. सुट्टीची समस्या असल्याने नेहमी येण्यास जमत नाही. तिकडे गेल्यावर यांच्याशी क्वचित संपर्क होतो. तिथे गेल्यावर फक्त या मित्रांच्या आठवणी असतात. त्यामुळे हे क्षण आम्ही पूरेपूर जगण्याचा प्रयत्न करतो. अनेक मित्र पोलीस भरती, सैन्य भरतीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनाही शक्य तेवढे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो.

जरी हे सर्व मित्र हसत खेळत निरोप देत असले तरी आतून मात्र सर्व भावनिक झाले होते. गाडी सुरू होताच या सर्वांचे डोळे अचानक पाणावले. गाडी पुढे निघाली आणि सर्व जड अंतःकरणाने टाटा बाय करत होते. यावेळी अक्षय वाघाडे, राहुल रोडे, पंकज कुडमेथे, मनोज वकटी, सौरभ मोहितकर, आदित्य पावडे, शिवाजी डोनेवार, शुभम राजूरकर, सुदू चिंचोलकर, निनाद उरकुडे यांच्या सह मित्रपरिवार
उपस्थित होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.