पुरुषोत्तम नवघरे, वणी: आपली संस्कृती ही एवढी पवित्र आहे की ती आपल्याला यशस्वी जीवन जगण्याचा वेळोवेळी मार्ग दाखवते. आज जगातील अनेक देशांतील लोकांनी आपल्या संस्कृतीच्या आचरणाला सुरुवात केली आहे. मात्र आपल्या देशातील आजची तरुणाई ही पाश्चात्य संस्कृतीच्या मागे लागली आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणामुळे देशाची मुळ संस्कृती धोक्यात येत आहे. पाश्चात्य संस्कृती ही द्राक्षासारखी आहे, तर भारतीय संस्कृती रुद्राक्षासारखी आहे. भारतीय संस्कृती रुद्राक्ष असल्याने ती कधीही सडत नाही. त्यामुळे स्वत:ची संस्कृती ही स्वत:लाच जपायला पाहिजे, असे आवाहन सोपान कणेरकर यांनी केले. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध युवा व्याख्याते सोपानदादा कणेरकर यांचे शनिवारी दिनांक 28 सप्टेंबर रोजी वणीतील शेतकरी मंदिरात व्याख्यान पार पडले. यावेळी ते बोलत होते. पारसमल चोरडिया फाउंडेशन व भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
व्यासपिठावर विजय चोरडिया, ऍड कुणाल चोरडिया, ख्याती चोरडिया व मुन्ना महाराज तुगनायक यांची प्रमुख उपस्थिती होती. शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला हारार्पण व अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय चोरडिया यांनी केले. शहीद भगतसिंग यांचे कार्य तरुणाईसाठी कायम प्रेरणादाई राहिलेले आहे. शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आजच्या पिढीला मार्गदर्शन व्हावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.
सोपानदादा कणेरकर यांनी आपल्या प्रभावी शैली व अभिनयातून आजचा काळ, इतिहास, पुराणकालीन दाखले देत विविध विषयांना हात घातला. शेरोशायरी करीत हलक्या फुलक्या प्रसंगातून त्यांनी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. आजच्या आधुनिक काळात तरुण-तरुणींनी छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, शहीद भगतसिंग यांचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे त्यांनी व्याख्यानातून मांडले. आजची तरुणाई भरकटत आहे, महागडे मोबाईल, गाडी, सोशल मीडिया याच्या सवयी ऐवजी तरुणाईने समाजकार्यात वेळ खर्ची केला, चांगल्या सवयी लावल्यास त्याचा त्यांच्या आईवडिलांना देखील अभिमान राहिल. असे ते म्हणाले. महिलांनी डोक्यावर पदर ठेवावा तसेच लोकांनी शाकाहारी व्हावे, असे आवाहन त्यांनी व्याख्यानातून उपस्थितांना केले. व्याखानात त्यांनी विजय चोरडिया यांच्या विविध सामाजिक कार्याचा व धार्मिक कार्याचा दाखला देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
जयप्रकाश सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे बहारदार संचालन केले तर उपस्थितांचे आभार विशाल दुधबळे यांनी मानले. लवकरच पुन्हा एकदा मोकळ्या मैदानात सोपान कणेरकर यांचे व्याख्यान वणीत आयोजित केले जाईल, असे आयोजकांतर्फे जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाला वणी व ग्रामीण भागातील तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांची व पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर उपस्थितांच्या जेवणाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली होती.
Comments are closed.