सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: श्रावणी रानमेवा कटुले यंदा उशिरा का होईना टिळक चौकात विक्रीसाठी आलेत. यावर्षी ते श्रावणाच्या अखेरीस किंवा भाद्रपदाच्या सरुवातीला आलेत. आषाढ-श्रावण म्हणजे रानमेव्यांची मेजवानी. बाजारात छोट्या छोट्या ढीगांमध्ये रानमेव्यांचं थाटात आगमन सुरू झालं. पहिल्या-वहिल्या पावसात येतो तराेटा. तरोट्याच्या पावलांवर पावलं टाकत रानातून जेवणाच्या पानात येते फांजी.
वाघाट्याच्या भाजीची लज्जत घ्यायची ती याच आषाढ-श्रावण महिन्यात. या सर्व भाज्यांमधील प्रचंड डिमाड असेलेला कटुले किंवा काटवलं हा श्रावणी रानमेवा बाजारात आला आहे. पूर्वी केवळ श्रावणातच ही फळभाजी मिळायची. मात्र अलीकडच्या काळात ते आषाढातही मिळायला लागलेत.
पूर्वी नैसर्गिकरीत्या मिळणारी ही काटवलं किंवा कटुली आता शेतीतून पिकवायला सुरुवात झाली. जुन्या-जाणत्या लोकांना याचे औषधी गुणधर्म माहिती असल्यानं याचं आहारात फार महत्त्व आहे. हिरवे काटेरी छोटेसे फळ विविध भागांत विविध नावांनी ओळखलं जातं. ही वनस्पती ‘कुकरबिटेसी’ म्हणजेच भोपळ्याच्या कुळातील आहे.
शास्त्रीय माहिती….
विदर्भाबाहेर याला करटोली, कंटोली, रानकारली, कर्कोटकी, करटुली आणि इंग्रजीत याला वाईल्ड करेला फ्रूट म्हणतात. याला काटेरी टरफल असल्यामुळे ‘स्पाईनी गॉर्ड’ असंही म्हणतात. याचं शास्त्रीय नाव ‘मोमार्डिका डायओयिका’ असल्याचं अरविंद पोहरकर यांनी सांगितलं. काटवलं हे कुकरबिटेसी कुळात येतात.
डोंगराळ भागातील वातावरण या फळभाजीला अत्यंत पोषक असतं. विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम घाट व पश्चिम महाराष्ट्रात हे नैसर्गिकरीत्या मिळतात. याची शेतातदेखील लागवड केली जाते. येथील भाजी व्यावसायिक महेंद्र टेकाडे यांनी सांगितलं की, काही जण याची वेल घरी लावण्याचा प्रयत्न करतात.
हा रानमेवा आहे. हा रानातून आल्यावरच खावा. कटुली / काटवलं / करटोलीच्या वेलीला कंद असतात. यात ‘मेल’ व ‘फिमेल’ म्हणजेच नर व मादी वेल असते. जाणीवपूर्वक शेतीत लावण्याकरिता शेतकरी याच्या प्रमाणाबाबत दक्षता घेतात.
निसर्गाची अमूल्य देण….
हा रानमेवा जंगल परिसरात राहणारे किंवा आदिवासी बांधव शहरात विकायला आणतात. अमरावतीला हा माल मेळघाट, वरूड, वर्धेकडील देवगाव फाटा या भागांतून येतो. याची डिमांड पाहता अगदी पिशवीतला माल खाली ओतल्याबरोबर अगदी काही मिनिटांमधेच विकला जातो. ही निसर्गाची अमूल्य देण आहे.
तालुक्याच्या ठिकाणी हे भांड्याच्या मापाने किंवा सुमारे 20-30 रूपये ढीग या दराने विकले जातात. अमरावतीत हे जवळपास 200 रूपये किलो आहेत. पावसाळ्याच्या आरंभी हे जाणीवपूर्वक विविध माध्यमांतून खाल्लेच पाहिजेत, असं जुन्या-जाणत्यांचं म्हणणं आहे. यात अनेक औषधी गुणधर्म असतात. सामान्य लोकच हे बाजारात विकायला आणतात. याचे मूल्य ठरवणे कठीण असते. मात्र त्यातही काही ‘बारीक’’ भावबाजी करतात.
उत्सव रानभाज्यांचा….
पावसाळ्यांत दिवतीचे फूल, कोयलारी, मुरमाटे फूल, चिलीचे गोळे, अंबाडी, भुचवई, तरड कोतला, टाकळा, शेवरं, कंटोली, भारंगी, फोडशी, कुळू, तांदुळजिरा, दुडीची फुले, माठला, कुर्डू, घोळ / चिवळी किंवा चिवई, रानतोंडली, भुई पालक, रानशेपू, रानवांगी, रानदोडकी, रानभोपळे अशा विविध रानमेव्यांचा आनंद घेता येतो. ग्रामीण भागात या भाज्या सगळ्यांना माहीत असतात. त्यामुळे याची तिथे सहसा विक्री होत नाही. मात्र ज्यांना या भाज्यांचं महत्त्व माहीत आहे, ते चातकासारखी याची वाट पाहत असतात.
औषधी गुणांनी समृद्ध
मादी काटवलाच्या वेलीचे कंद औषधी म्हणून वापरतात. कटुल्याच्या पानाचा रस डोकेदुखीवर उपयोगी आहे. याच्या कंदाचा वापर मुतखडा, विषबाधा, हत्तीरोग, रक्तस्राव, आतड्यांच्या तक्रारीवर होतो. थंडी वाजून ताप, कफ, बद्धकोष्ठता, दमा, उचकी, मूळव्याध यावर ही वनस्पती अत्यंत गुणकारी असल्याचं जाणकार सांगतात.
हे फळ कडू आणि उष्ण गुणाचं आहे. डायबेटिक पेशंटला हे लाभदायक आहे. मळमळ, नेत्रविकार, हृदयाचा त्रास, मूत्रस्राव, कुष्ठराेग, लघवीतील साखरेचं नियंत्रण त्वचारोग आणि पावसाळ्यांतील विविध आजारांवर कटुले गुणकारी आहेत. सर्दी, खोकला आणि ताप यातही याचा असर होतो. मात्र यासाठी डॉक्टरचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे.
निसर्गाचं हे देणं आहे. निसर्गाच्या अनेक अदभूत चमत्कारांतील हा एक चमत्कारच आहे. अगदी मोजक्या दिवसांसाठीच हा रानमेवा येतो. याचा आस्वाद घेणारे वेगवेगळ्या पद्धतीने काटवलाच्या भाज्या करता येतात. हा निसर्गाचा अमूल्य ठेवा आहे. काटवलाचे गुण ओळखून, उपयुक्तता ओळखून या पावसाळ्यात अस्सल रानमेवा चाखायचा असेल तर कटुले आणायला पडाच घराबाहेर….