बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील एसपीएम विद्यालयाच्या अंडर 17 मुलींचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत हा संघ महाराष्ट्र राज्य युवक सेवा संचालनालयाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. शुक्रवारी दिनांक 4 ऑक्टोबरपासून नागपूर येथे ही राज्यस्तरीय स्पर्धा रंगणार आहे. सध्या या मुलींच्या संघाचा जोमात सराव सुरू आहे. या स्पर्धेतही उत्कृष्ट खेळ करण्याचा प्रामाणिक व यशस्वी प्रयत्न करणार, अशी प्रतिक्रिया विद्यार्थिनींनी दिली.
नुकत्याच झालेल्या अंडर 17 मुलींच्या आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाच्या मुलींचा संघ अमरावती विभागातून विजेता ठरला होता. येत्या 04 चे 06 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने राजस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहे. वणीसारख्या छोट्या शहरात सातत्याने सराव करीत राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या मुलींच्या व्हॉलीबॉल संघाचे विदर्भात सर्वत्र कौतुक होत आहे. या खेळाडू मुलींना शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व संस्कार क्रीडा मंडळाने मार्गदर्शन केले.
शिक्षण प्रसारक मंडळ व संस्कार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक प्रमोद क्षीरसागर, क्रीडा शिक्षिका इंदू सिंग, शिक्षक दत्ता मालगडे, व्हॉलीबॉलचे तालुका प्रशिक्षक रूपेश पिंपळकर, संस्कार क्रीडा मंडळाचे संतोष बेलेकर, प्रदीप कवरासे यांनी व्हॉलीबॉलचे प्रशिक्षण दिले. संस्कार क्रीडा मंडळाच्या वतीने अध्यक्ष विजय मुकेवार यांनी या व्हाॅलिबॉल संघाला नेट, व्हाॅलिबॉल व क्रीडा साहित्य बक्षिस दिले.
Comments are closed.