वणीच्या एवढ्या मोठ्या लोकनेत्याची ऑफर सर विश्वेश्वराया नाकारतात तेव्हा….
‘अभियंतादिन’ अर्थात मोक्षगुंडम विश्वेश्वरराया यांची आज जयंती
सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः सर मोक्षगुंडम विश्वेश्वरराया यांचं नाव आणि कार्य देशभर पसरलं. त्यांचा लौकिक वाढला. एकदा पटना येथे त्यांचं काम होतं. तेव्हा तत्कालीन राज्यपाल माधव श्रीहरी अणे यांनी त्यांना राजभवनात राहण्याची ऑफर दिली. माधव श्रीहरी अणे म्हणजे वणीचे लोकनायक बापुजी अणे.त्यांच्या टीमने बाहेर हॉटेलमध्ये राहावं आणि त्यांनी राजभवनात राहावं हे विश्वेश्वरराया यांना पटलं नाही. त्यांनी ही ऑफर अत्यंत नम्रपणे नाकारली. त्यांनी आपल्या पद अथवा प्रतिष्ठेचा कधीच गैरफायदा घेतला नाही.
ब्रिटीश राजवटीचा तो काळ होता. रेल्वेत साध्या; पण निटनेटक्या कपड्यातली ती भारतीय व्यक्ती शांत बसली होती. रेल्वे सुरू होती. सोबत काही इंग्रजदेखील होते. ते त्या व्यक्तीकडे तुच्छतेने बघत होते. इतक्यात ती व्यक्ती रेल्वेची चैन ओढते. रेल्वे थांबते. इंग्रज ओरडतात. कारण विचारतात. ती सावळीशी भारतीय व्यक्ती शांतपणे उत्तर देते.
पुढे काही अंतरावर रेल्वे रुळात काही गडबड आहे.’ खरंच काही अंतरावर रेल्वेचे रूळ उखडले होते. एक मोठा अपघात ‘त्या’ भारतीयामुळे टळला होता. सगळेजण कुतुहलाने विचारतात. त्यांना हे कसं कळलं. त्यावर ती भारतीय व्यक्ती म्हणाली, केवळ गाडीच्या आवाजाने. गाडी चालताना एक विशिष्ट तालात आवाज येतो.
तो ताल चुकल्याचे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी गाडी थांबविली. इंग्रजांसह सगळेच सहप्रवासी ऐकून आश्चर्यचकित होतात. ती तीक्ष्ण बुद्धीची व्यक्ती होती, भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरराया . शतकोत्तर आयुष्य जगणाऱ्या विश्वेश्वरराया यांची 15 सप्टेंबरला जयंती आहे. हा दिवस भारतात ‘अभियंतादिन’ म्हणून साजरा होतो. त्यामागेही खूप मोठी कहाणी आहे.
एम. व्ही. म्हणजे मोक्षगुंडम विश्वेश्वरराया. त्यांचं मूळ गाव आंध्रप्रदेशातील मोक्षगुंडम. तेव्हाच्या मैसूर आणि आताच्या कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूरच्या मुद्देनहळ्ळी येथे त्यांचा 15 सप्टेंबरला जन्म झाला. त्यांचे वडील श्रीनिवास शास्त्री तर आई व्यंकटलक्षमा होत्या. विश्वेश्वरराया यांना तीन भाऊ आणि दोन बहिणी होत्या. एम. व्ही. हे त्यांचं टोपण नाव. तसा यांचं नाव विश्वेश्वरय्या, विश्वेश्वरया, विश्वेश्वराया असंही लिहिलं किंवा उच्चारलं जातं.
वडील संस्कृतज्ज्ञ आणि विविध ग्रंथांचे भाष्यकार होते. तसेच त्यांना आयुर्वेदाची जाणदेखील होती. विश्वेश्वरराया 15 वर्षांचे असताना त्यांच्या वडलांचे निधन झाले. आईला आपल्या लेकरातील चुणूक दिसत होती. ते मुद्देनहळ्ळीला परत आलेत. मामांच्या मदतीने त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. विश्वेश्वरराया यांच्या बाबतीत एक किस्सा सांगितला जातो. एकदा त्यांचे रामय्या मामा मुक्कामानेच आले होते.
सहज गप्पागोष्टी सुरू होत्या. तेव्हा त्यांना कळलं की, त्यांचा भाचा म्हणजे विश्वेश्वरराया हे गेल्या दोन महिन्यांपासून शाळेत गेलेच नाहीत. स्वाभाविकतः मामा प्रचंड चिडलेत. त्यांनी लगेच खडे बोल सुनावलेत. बहिणीलाही म्हणजेच विश्वेश्वररायाच्या आईलाही समजावून सांगितले. रामय्या मामांकडे राहून त्यांनी शिक्षण घेतले. पुढे 1875मध्ये वेल्स्लियन मिशन हायस्कूलमध्ये ते दाखल झालेत.
चिकबळ्ळापूरला प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांनी उच्चमाध्यमिक शिक्षण बंगलोर येथे घेतले. नंतर 1881मध्ये तेव्हाच्या मद्रास येथून त्यांनी पदवी घेतली. नंतर 1883मध्ये पुण्यातून इंजिनिअरींगची पदवी फर्स्ट क्लासमध्ये मिळवली. त्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग लोकहितांसाठी केला. पदवी मिळाल्यानंतर त्यांना बांधकाम खात्यात नोकरी मिळाली.
ते नियमित विविध प्रयोग करीत. धरणांच्या, जलसाठ्यांच्या पाण्याचे नियोजन आणि नियंत्रण करण्याचे तंत्र त्यांनी विकसित केलं. पूरनियंत्रणासाठी त्यांनी गेट सिस्टीम अर्थात द्वारप्रणाली डेव्हलप केली. त्याचा यशस्वी प्रयोग पुण्याजवळील खडकवासला येथे सन 1903साली झाला.
नद्यांच्या पाणीवाटपात तेव्हा असमानता होती. विषमता होती. त्यामुळे विश्वेश्वरराया यांनी पाणीवाटपाची एक नवी ब्लॉक सिस्टीम विकसित केली. त्यामुळे विविध भागातील पिकांना चक्राकार पाणी मिळू लागले. पाण्याचे समान वाटप होऊ लागले. पुराचा धोकाही कमी झाला. ही सिस्टीम आजही वापरली जाते.
विश्वेश्वरराया यांच्या ज्ञानाचा लाभ भारतातल्या अनेक राज्यांना झाला. अनेक संस्थानिकांनी त्यांना एक्स्पर्ट म्हणून अनेकदा बोलावले. त्यातील एक होते कोल्हापूर संस्थानच्या राजाराम महाराजांचे वंशज. कोल्हापूरला तेव्हा मातीच्या बांधाऱ्यातून पाणी पुरवठा व्हायचा. तो बांधारा खचण्याची शक्यता होती. तेव्हा विश्वेश्वरराया यांनी मार्गदर्शन केले. किंबहुना जातीने लक्ष घालून त्यावर एक पक्का तोडगा दिला. सन 1932मध्ये तेव्हाच्या सिंध प्रांतातील आणि आताच्या पाकिस्तानातील सुक्कूर येथील पाणीपुरवठ्यावर त्यांनी सर्वोत्तम तोडगा काढला.
विश्वेश्वरराया यांची कीर्ती चौफेर पसरली. पुढे त्यांनी ग्वाल्हेर, म्हैसूरचे कृष्णराज सागर अशा अनेक ठिकाणी याचे यशस्वी प्रयोग केलेत. कावेरी नदीवरील कृष्णराज सागर प्रकल्पाचा प्रस्ताव ठेवण्यापासून ते पूर्ण होईपर्यंत त्यांनी प्रत्येक कामावर अत्यंत बारीक लक्ष ठेवलं. त्याकाळात देशात सिमेंट तयार होत नव्हतं.
तेव्हा तत्कालीन इंजिनियर्स ‘मोर्टार’ हा पदार्थ बांधकामात वापरत. कृष्णराजसागरमध्ये हेच वापरण्यात आलं. हैद्राबाद शहराला पुरापासून मुक्ती दिली. विशाखापट्टणमचा किनारा वाचवला. ओडिसादेखील पुरांमुळे त्रस्त होतं. त्याकाळात त्यांनी यावर सोल्युशन देणारा अहवाल सादर केला. त्यानुसार हिराकुंड आणि अनेक बांध तयार झालेत. ओडिसाच्या पुरामुळे होणाऱ्या नुकसानीची तिव्रता कमी झाली.
केवळ इंजिनियरच नव्हे तर अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ म्हणूनदेखील विश्वेश्वरराया यांची दृष्टी नि कार्य व्यापक होतं. स्वेच्छानिवृत्तीनंतर ते म्हैसूर राज्याचे दिवाण झाले. हे पद मुख्यमंत्र्याच्या तोडीचं होतं. म्हैसूरचे महाराज चवथे वोडियार त्यांच्या कार्याने प्रभावीत होते. त्यांच्या कार्यामुळेच त्यांना ‘म्हैसूरचा पिता’देखील म्हणत.
आपल्या म्हेसुर राज्याच्या कारकीर्दीत त्यांनी विविध उद्योगधंदे सुरू केलेत. मोडकळीस आलेल्या उद्योगांना चालना देत नवजीवन दिलेत. त्यांच्याच प्रयत्न आणि पुढाकारातून म्हैसूर सोप फॅक्टरी, कीटकनाशक प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न अॅण्ड स्टील वर्कस्, पॉलिटेक्निक इंस्टिट्यूट, बंगलोर अॅग्रिकल्चरल युनिवर्सिटी, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, सेंच्युरी क्लब, चेंबर ऑफ कॉमर्स सुरू झालेत. विविध रस्त्यांच्या कामांतही त्यांचं मोलाचं योगदान होतं. सन 1917मध्ये बंगलोर येथे त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली.
विविध ग्रंथ आणि साहित्यवाचानाचा वारसा एम. व्ही. यांना त्यांच्या वडलांकडून मिळाला. त्यांचं कन्नड भाषा आणि साहित्यावर नितांत प्रेम होतं. त्यासाठी त्यांनी कन्नड साहित्य परिषदेची स्थापना केली. कन्नड भाषा आणि साहित्य यासाठी त्यांना विशेष कार्य करायचं होतं. बरं एवढं असलं तरी देशातल्या सर्वच प्रादेशिक भाषांचा ते सन्मान करायचे. महाराष्ट्रात ते जवळपास 26 वर्षं राहिलेत. त्यांना मराठीचंही उत्तम ज्ञान होतं.
विश्वेश्वरराया यांच्या प्रयत्नातूून शिक्षणक्षेत्रात मोठी क्रांती झाली. तेव्हाच्या म्हैसूर राज्यांतील शाळांची संख्या 4,500 वरून 10,500 पर्यंत वाढली. विद्यार्थी दीड लाखांवरून जवळपास साडेतील लाखांपर्यंत गेलेत. मुलींसाठी स्वतंत्र होस्टेल सुरू झाले. देशातले पहिले फर्स्ट ग्रेड महाराणी कॉलेज सर विश्वेश्वरराया यांच्या पुढाकारातूनच सुरू झाले. म्हैसूर विद्यापीठाची स्थापना तर त्यांच्या अनेक स्वप्नांपैकी एक होतं. ते पूर्ण झालं. इंडस्ट्रियल आणि अॅग्रिकल्चरल कॉलेजही पुढे सुरू झालेत. विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप आणि विदेशातील शिक्षणासाठी मदतीचीही तरतूद झाली.
म्हैसूर येथे ऑटोमोबाईल आणि एअरक्राफ्ट क्षेत्रात काम व्हावं, हे विश्वेश्वरराया यांचं स्वप्न होतं. त्यानुसार सन 1935साली कामाला सुरुवात झाली. बंगलूर येथे हिंदुस्थान एअरोनॉटिक्स आणि मुंबईत प्रिमियर ऑटोमोबाईल्स सुरू झालेत. इंडिया मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे ते अध्यक्षदेखील राहिलेत. देशातील गरिबी, अज्ञान, निरक्षरता, आजार, बेरोजगारी अशा अनेक प्रश्नांनी ते चिंतीत होते. किंबहुना या विषयावर त्यांनी कार्यदेखील केलं. उद्योग आणि शेतीवरही त्यांच विशेष लक्ष होतं.
विविध समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्यांनी ‘इकॉनॉमीक काँफ्रन्स’ ही संकल्पना मांडली. विश्वेश्वरराया यांच्या कार्यांची सर्वत्र दखल घेतली जाऊ लागली. त्यांना ‘नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडियन एंपायर’ हा तेव्हाचा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला. सन 1923च्या इंडियन सायन्स काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. त्यांना ‘केसर ए हिंद’ म्हणून गौरविले होते. भारत सरकारने 1955 साली त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान केला. त्यांच्या 100व्या जन्मदिवसानिमित्त पोस्टाचं तिकीटही निघालं.
विश्वेश्वरराया विविध संस्थांचे सदस्य होते. इंस्टिस्टूट ऑफ सिव्हील इंजिनिअर्स या आंतराष्ट्रीय संस्थेचे ते सदस्य होते. इंस्टिट्यूट ऑफ सायन्सच्या बंगलोर ब्रांचने त्यांना फेलोशीप दिली. अनेक विद्यापिठांनी त्यांना डॉक्टरेट पदवी दिली.
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरराया यांनी आयुष्यभर शरीरस्वास्थ्य जपले. म्हातारपणाबद्दल त्यांना कुणीतरी विचारले होते. तेव्हा त्यांनी गमतीने उत्तर दिले. ते म्हणालेत, ‘‘म्हातारपण जेव्हा माझं दार ठोठावतं, तेव्हा मी आतून आवाज देतो, की विश्वेश्वरराया घरात नाहीत. तेव्हा ते निराश होऊन परत जातं. त्यामुळे म्हातारपणाची नि माझी भेटच होत नाही.
मग ते माझ्यावर कशी सत्ता गाजवेल?’’ त्यांचं वय वाढल्यावरही त्यांचा उत्साह आणि काम करण्याची ऊर्जा कमी झालेली नव्हती. एकदा त्यांच्यासह काही भारतीय अमेरिकेत फॅक्टरींच्या अभ्यासाठी गेलेत. तिथल्या एका फॅक्टरीत खूप मोठी मशीन होती. ती पाहण्यासाठी 75 फूट उंच शिडी चढावी लागायची. त्याही वयात विश्वेश्वरराया ती शिडी चढलेत. मशीनचं अभ्यासपूर्ण सूक्ष्म निरीक्षण केलं.
सन 1952ची गोष्ट आहे. तेव्हा त्याचं वय 92वर्ष होतं. गंगानदीवर राजेंद्रपूलाच्या निर्माणाची योजना होती. प्रचंड ऊन वाढलं होतं. साईट अशी होती, की तिथे कारने जाणं शक्य नव्हतं. तेव्हा त्याही वयात ते पायी चालत साईटवर पोहचले. एवढ्या उन्हातही पूर्ण काम पाहिले.
वयाची शंभरी ओलांडल्यावरही त्यांनी पायी चालण्याची सवय सोडली नाही. ही पायी चालण्याची सवय त्यांना आरंभीच्या काळातच लागली. ते म्हैसूरला होते तेव्हा ट्युशन्स घेत. म्हैसूरच्या राजाचे मंत्री मुड्डय्या यांच्या मुलाला ते घरी जाऊन शिकवत. रात्री मुक्काम त्यांच्याचकडे करीत. सकाळी ट्युशन झाली की, ते जवळपास दोन किलोमिटरवर जिथे राहत तिथे जात. नंतर तिथून जवळपास 7 किलोमिटरवरील त्यांच्या कॉलेजात जात. रात्री जेवायला घरी जाऊन परत ट्युशनसाठी मंत्र्यांकडे ते पायीच जात. एवढी पायी चालण्याची क्षमता आणि सवय त्यांना पूर्वीपासूनच होती.
विश्वेश्वरराया यांनी जवळपास 11 पुस्तकं लिहिलीत. भारत पुननिर्माण, अर्थव्यवस्था, समाज, उद्योग अशा अनेक विषयांचा त्यात समावेष होता. एवढेच नव्हे वयाच्या 98व्या वर्षीदेखील ते एका पुस्तकाचं लेखन करीतच होते. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांची लोकहितासाठी तळमळ होती. इंजिनिअरिंगचा समाजहितासाठी कसा उपयोग करावा याचा ते आदर्श होते. त्यांची कार्य करण्याची दिशा, नियोजन आणि शिस्त वाखाणण्याजोगी होती. शेवटच्या श्वासापर्यंत ते लोकांसाठी झटत राहिलेत. त्यांच्या जयंतीदिनी अर्थात अभियंतादिनी त्यांना विनम्र अभिवादन.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)