लालपरी सुरू झाली, मात्र प्रवासी फिरकेना
लांबपल्याची सेवा सुरू, इतर सेवा प्रवासी वाढल्यावर सुरू होणार
जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिल महिन्यापासून बंद असलेली आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत एसटी बस सेवा सोमवार 7 जुन पासून पुन्हा सुरू झाली. मात्र प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने एस टी महामंडळ टप्याटप्याने सर्व फेऱ्या सुरु करणार आहे. सध्या वणी बस स्थानकावरून लांब व मध्यम पल्याची सर्व बसेस सुरु करण्यात आली आहे. परंतु ग्रामीण विभागात मुकुटबन व गडचांदुर वगळता इतर गावासाठी बसफेऱ्या सुरु करण्यात आली नाही.
वणी येथून नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोलासाठी एसटी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र वणी डेपोच्या वणी अदिलाबाद ही आंतरराज्यीय बस पाटणबोरी प्रयन्त पाठविण्यात येत आहे. अदिलाबाद बस स्थानकावरून सोडण्यात येणारी आदीलाबाद- वणी, आदीलाबाद- मुकुटबन बस सेवा अद्याप सुरु करण्यात आली नाही.
साधारण परिस्थितीत वणी बस स्थानकावरून दररोज तब्बल 200 फेऱ्या सुरु असते. परंतु प्रवाश्यांची कमी संख्या लक्षात घेता सोमवार पासून 80 फेऱ्या सोडण्यात येत आहे. वणी आगारात 40 बसेस, 96 नियमित चालक व 78 वाहक कार्यरत आहे. शासनाने एस.टी. बसेस पूर्ण आसन क्षमतेनुसार सुरु करण्याचे आदेश दिले आहे. परंतु ग्रामीण भागात शेती मशागतीच्या कामांना सुरुवात झाल्यामुळे प्रवाशी संख्या कमी आहे.
एसटीला सहकार्य करावे: टीपले
वणी आगारातून प्रवाशी संख्येनुसार टप्याटप्याने सर्व फेऱ्या सुरु करण्यात येईल. खासगी वाहनांच्या तुलनेत एसटीने प्रवास स्वस्त आणि सुरक्षित आहे. शिवाय कोरोना महामारीमुळे एसटी संपूर्ण सॅनिटाईज केलेली असते. ग्रामीण भागातील प्रवाशांनी कोरोना नियमाचे पालन करून जास्तीत जास्त एसटी बसनेच प्रवास करावा.
:एस.एस. टिपले: आगार व्यवस्थापक, वणी
हे देखील वाचा: