वणी शहरात मालवाहू व जड वाहनामुळे वाहतूक विस्कळीत

रस्त्यावर वाहन उभे करुन माल लोडिंग अनलोडिंग

0

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मध्यभागी असलेली बाजारपेठ आणि खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. त्यातही जड व मालवाहू वाहने शहरातील प्रमुख रस्त्यावर उभे असल्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. शहरातील रस्त्यावर सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत जड वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. परंतु ऑटो, पिकअप, बोलेरो, छोटा हत्ती सारख्या मालवाहू वाहनासह टाटा 407 मॅटाडोर, आयशर व मोठे ट्रकसुद्धा शहरातील रस्त्यावर दिवसभर वाहतूक करीत आहे.

शहरातील सर्वात वाईट परिस्थिती टिळक चौक, आंबेडकर चौक, महाराष्ट्र बँक चौक, गांधी चौक, टुटी कमान, भाजी मंडी, जटाशंकर चौक येथे दिसून येते. या भागात खरेदीसाठी येणारे बहुतेक लोक रस्त्यावर आपली वाहने पार्क करतात. तर मालवाहू वाहने देखील रस्त्यावर उभे करून माल चढविले व उतरविले जातात. या समस्येकडे अनेकदा नगर परिषद, वाहतूक पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही लक्ष वेधण्यात आले आहे. परंतु त्यानंतरही या समस्येचा निराकरण करण्याची जवाबदारी कोणीही घेताना दिसत नाही.

वस्तुतः रस्त्यावर मालवाहू वाहने उभी राहिल्याने वाहतुकीला अडथळा तर येतेच मात्र अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शहरात वाहन पार्किंग व्यवस्था करण्याची जवाबदारी नगर परिषदची असते. तर वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर आहे. परंतु या दोन्ही विभागांनी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. शहरात कुठेही पार्किंगची जागा नाही. एवढेच नव्हे तर नगर परिषदेने रस्त्यावर कोणतेही चिन्हांकन किंवा लाईनिंगदेखील केलेली नाही जेणेकरून वाहनचालक रस्ता सोडून वाहन बाजूला लावतील. शहरातील सर्वच फूटपाथ किरकोळ व्यावसायिक व फळभाजी विक्रेत्यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे.

मनाई असतानाही दिवसाच लोडिंग अनलोडिंग सुरू

नगरपालिका कायद्यातील तरतुदीनुसार प्रवासी, मालवाहू वाहने मुख्य रस्त्यांवर उभे करण्यास सक्त मनाई आहे. नो पार्किंग झोनमध्ये वाहन पार्क करण्याच्या शिक्षेचीही तरतूद आहे. या नियमाचे उल्लंघन करणार्‍यांना 6 महिने पर्यंत कारावास आणि 5000 रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते, परंतु हा नियम वणी येथे लागू केला जात नाही, यामागील मुख्य कारण म्हणजे नगर परिषदेची उदासीनता दिसून येते. शहरात एकमात्र पार्किंग ठिकाण नगर परिषदला लागून सार्वजनिक रंगमंचच्या जागेवर आहे. त्याव्यतिरिक्त शहरात कुठेही पार्किंग व्यवस्था उभारण्यात आली नाही. 

वाहतूक शाखा ठरत आहे कुचकामी
वणी शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वेगळी वाहतूक शाखा कार्यरत आहे. मात्र शहरातील प्रमुख मार्ग व वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस दिसेनासे झाले आहे. टिळक चौक येथे कर्तव्यावर असलेले वाहतूक शिपाई दुचाकी चालकांना थांबवुन चालान करण्यात गुंग आहे. तर बस स्थानक परिसरातील कर्मचाऱ्यांची ड्युटी ऑटोरिक्षा चालकांकडून मासिक वसुली करिता असल्याचे बोलले जाते. येथील स्टेट बँकच्या मुख्य शाखासमोर रस्त्यावर दिवसभर वाहतूक ठप्प होत असताना एकही वाहतूक पोलीस त्या भागात फिरकतसुद्दा नाही. वाहतूक शाखेत स्टाफची कमतरता असल्याचा देखावा करून कर्तव्यापासून हात झटकत असल्याचे नागरिकांचे आरोप आहे.

शहराच्या मध्यभागी अनेक खाजगी व राष्ट्रीयीकृत बँका आहे. परंतु कोणत्याही बँक किंवा कार्यालय बाहेर पार्किंग स्पेस नाही. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या ग्राहकांना नाईलाजाने आपले वाहन रस्त्यावर उभे करावं लागतात. शहरातील पार्किंग समस्येकडे नगर पालिका प्रशासनाने कधीच गांभीर्याने पाहिले नाही. जर सुरुवातीपासूनच याकडे लक्ष दिले गेले असते, तर शहरातील मुख्य मार्गावर आज जशी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली नसती.

हे देखील वाचा:

लालपरी सुरू झाली, मात्र प्रवासी फिरकेना

करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप टू डेट

Leave A Reply

Your email address will not be published.