डेपो कर्मचाऱ्यांच्या संपामुळे डेपो ओस, एकही धावली नाही बस
कर्मचाऱ्यांचा संप 100% यशस्वी, प्रवाशांचे हाल
निकेश जिलठे, वणी: अत्यल्प वेतनामुळे वेतनवाढ करावी आणि विविध मागणीसाठी राज्यभरातील डेपो कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहे. या संपाचा मोठा फटका प्रवाशांना बसला. संपामुळे एकही गाडी वणी डेपोतून सुटली नाही. अनेक प्रवासी एखादी गाडी मिळेल या आशेवार डेपोमध्ये वाट बघत होते मात्र त्यांच्या पदरी निराशा आली.
संपाचा मोठा विद्यार्थी वर्गाला बसला. सध्या दिवाळीच्या सुट्या असल्याने अनेक विद्यार्थी गावी परत जाण्यासाठी निघाले मात्र बस बंद असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. शेवटी उपाय नसल्याने त्यांना खासगी ऑटो आणि काळीपिवळीने प्रवास करून गावाचा मार्ग धरावा लागला.
एकाच पदावरील दुसऱ्या महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये विलक्षण फरक आहे. वीजवितरण, पीडब्ल्यूडी, इत्यादीमध्ये काम करणाऱ्या क्लर्क आणि ड्रायव्हरला वेगळा पगार आहे, तर एसटीमहामंडळातील काम करणाऱ्या याच पदावरील कर्मचाऱ्यांना अत्यल्प वेतन आहे. वेतनवाढ करून हे वेतन इतर महामंडळातील पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतना इतके करावे ही प्रमुख आणि इतर मागण्या घेऊन आजपासून राज्यभरातील एसटी डेपो कर्मचारी संपावर गेले आहेत.
सरकार फक्त वेतनवाढीचं आश्वासन देते मात्र दरवर्षी आमच्या तोंडाला पाने पुसली जातात. एसटी कर्मचाऱ्यांचा एका कर्मचाऱ्याचा पगार जर 8 हजार असेल आणि जर दहा टक्के पगारवाढ झाली तरी त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना होत नाही. कित्येक वर्षांपासून केवळ 12 हजार पगारावर अनेक कर्मचारी काम करतात. कपात होऊन 8-9 हजार पगार हाती पडतो. आम्ही इतक्या कमी पगारात कसं घर चालवतो हे एकदा मंत्र्यांनी आमच्या घरात येऊन पाहावं अशी संतप्त प्रतिक्रिया वणी डेपो कामगार संघटनेचे सचिव अंकुश पाते आणि कार्याध्यक्ष सुभाष पुल्लेवार यांनी वणी बहुगुणीशी बोलताना दिली.
एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारा नाईट भत्ताही अत्यल्प आहे. ग्रामीण भागात हा भत्ता 7 रुपये, शहरी भागासाठी 9 रुपये आणि मेट्रोसिटीसाठी हा भत्ता 11 रुपये आहे. सोबतच कामाचे तास, सुट्टी अशा अनेक समस्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आहेत. दरवर्षी शासन वेतनवाढीचं आणि इतर मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देते मात्र लेखी आश्वासन देत नाही. अत्यावश्यक सेवेचे कारण देऊन प्रशासन नेहमी कर्मचाऱ्यांच्या मागणीला हुलकावणी देते. असे संपकरी कर्मचाऱ्यांनी सांगितले. सोबत अवैध वाहतुकीमुळे डेपोचं मोठं नुकसान होत आहे. याबाबत आम्ही डेपो मॅनेजरद्वारा पोलीस विभागात वारंवार निवेदन दिले आहे. मात्र याकडे कायम दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
वणी आगारामध्ये एकूण 45 गाड्या आहेत या गाड्यांच्या सुमारे 192 ट्रिप रोज होतात. सुमारे 16.500 किमीचा प्रवास वणी डेपोच्या गाड्या करतात. यातून वणी डेपोला सुमारे 3 लाखांचं उत्पन्न रोज मिळते. सणावारांच्या दिवसांमध्ये या उत्पन्नात वाढ होऊन ते चार लाखांपर्यत जाते. संपामुळे सुमारे 3 ते 4 लाखांचं नुकसान एसटी डेपोचं झालं आहे.
अनेक प्रवासी घराबाहेर पडलेच नाही
संपामुळे अनेक प्रवाशांनी प्रवास करणे टाळले. असा अंदाज होता की संपामुळे खासगी वाहतुकदारांची आज चांगली कमाई होईल. मात्र प्रवासी नसल्याने त्यांच्याही पदरी निराशाच पडली. “रोज ऑटो भरायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ आजही लागत आहे. संप असला तरी आज आम्ही दरवाढ केली नाही मात्र प्रवाशांची संख्या कमी असल्याने संपाचा कोणताही फायदा झाला नाही” अशी माहिती ऑटोचालक रमेश घुंगरुड यांनी दिली.