सावधान ! ….तर 21 सप्टेंबर पासून वणी ते कोरपना बस होणार बंद
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी ते कोरपना या मार्गावर आबई फाटा ते कोळशी गावापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी 2 ते 3 फुट रुंद खड्डे पडले आहे. त्यामुळे या मार्गावरून बस चालवणे धोकादायक झाले असून अपघाताची दाट शक्यता आहे. यामुळे प्रवाशांच्या जिवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. तसेच खराब रस्त्यामुळे एसटी महामंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे 20 सप्टेंबर पर्यंत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास 21 सप्टेंबरपासून या मार्गावर धावणारी वणी-कोरपना ही बससेवा बंद करण्यात येईल, असा इशारा एसटी महामंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. याबाबत एसटी महामंडळाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आमदारांना निवेदन देण्यात आले आहे.
वणी ते कोरपना या मार्गावर शिरपूर, वेळाबाई, डोर्ली, कुरई, ढाकोरी, बोरी, कोळशी, हेटी इत्यादी गावे महत्त्वाची गावे आहेत. या गावावरून वणीला शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. तसेच बाजारासाठी व आरोग्यसेवेसाठी लोक या मार्गावरून वणीला येतात. तर अनेक लोक वणीवरून या मार्गावर नोकरी, शेतीसाठी जातात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. मात्र यामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने. सध्या पावसाळा असल्याने या मार्गावर चिखलाचा सडा साचला आहे. त्यामुळे या हा रस्ता बस चालवण्यासाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे बस चालक या मार्गावरून बस नेण्यास अनिच्छुक आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी निवेदन देऊन या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी गेली होती. वैभव कवरासे यांनी वेळोवेळी याबाबत पत्रव्यवहार केला होता. तर विद्यार्थ्यांनी व पालकांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रास्तारोको आंदोलन देखील केले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला काही केल्या जाग आली नाही. आता शासनाच्या अखत्यारीत येणा-या एसटी महामंडळानेच चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारा कंटाळून या मार्गावरील बस बंद करण्यासाठी निवेदन दिले आहे.
Comments are closed.