जब्बार चीनी, वणी: गेल्या एक वर्षांपासून वांजरी ते वडगाव हा पांदण रस्ता बंद आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. या महिण्यामध्ये रासायनिक खते, नांगर, वखर, बैलबंडी घेऊन जाण्यासाठी हाच रस्ता आहे. याशिवाय दुसरा पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे वडगावहून वांजरी जाणा-या शेतक-यांना त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी आदिवासी शेतक-यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.
वांजरी ते वडगाव हा पांदण रस्ता 10 मे 2019 पासून बंद आहे. या रस्त्याने वडगावचे शेतकरी त्या रस्त्याने 50 ते 60 वर्षांअगोदर पासून येजा करीत आहे. आजोबा पंजोबा पासून हा रस्ता आहे. महसूल विभागाच्या एका कर्मचा-याच्या नातेवाईकाने हा रस्ता बंद केल्याने याबाबत केलेल्या तक्रारीचा अहवाल स्पॉटवर न देता वरिष्ठांना विरोधात पाठवतात असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
शेतक-यांना सोसायटीची जमीन मिळालेली आहे. या रस्त्याबाबत शेतक-यांनी वारंवार तहसिल कार्यालयात खेटे मारले. वणीचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी शेतकरी संतोष विठू आसुटकर यांच्याबाजूने प्रकरण निकाली काढले. त्यानंतर शेतक-यांनी जिल्हाअधिकारी यवतमाळ यांच्याकडे धाव घेतली. याबाबत त्यांनी पहीले निवेदन 3 ऑक्टोबर 2019, दुसरे 16 नोव्हेंबर 2019 तर तिसरे निवेदन 16 जानेवारी 2020 ला दिले. तरी देखील न्याय मिळालेला नाही. असे शेतक-यांनी निवेदनात नमुद केले आहे.
जुन 2019 मध्ये तक्रारकर्त्या शेतक-यांनी संतोष आसुटकर यांनी लावलेले काटेरी तारेचे कुंपण 2 वेळा तोडले. यावरून त्यांच्यात भांडण देखील झाले आहेत. हे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ठ आहे. 4 एप्रिल 2020 रोजी सोसायटीच्या जमिनीची मोजणी होती परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ही मोजणी रद्द करण्यात आली. तरी शेतक-यांना सोसायटीची जमीन मोजण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी शेतक-यांनी निवेदनातून केली आहे. निवेदनावर गोपालकृष्ण बोरकर, मधुकर सालुरकर, बालाजी सालुरकर, आनंदराव सालुरकर, ज्ञानेश्वर सालुरकर, लहानु सालुरकर यांच्या सही आहेत.