टाकळी येथील संगीता राजू आदेवार यांचा गौरव
राज्यस्तरीय आदर्श पोलिस पाटील सेवारत्न पुरस्काराने सन्मानित
नागेश रायपुरे, मारेगाव : राज्यस्तरीय गुणिजन गौरव ऑनलाईन महासंमेलन 2020, ऑनलाईन पुरस्कार सोहळा 5 सप्टेंबर रोजी झाला. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्यावतीने राष्ट्रीय शिक्षकदिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आणि ऑनलाईन पुरस्कार वितरण ऑनलाईनच झाले.
राज्यातील विविध क्षेत्रांतून पुरस्कार देण्यात आलेत. या सोहळ्यात मारेगाव तालुक्यातील टाकळी येथील पोलीस पाटील संगीता राजू आदेवार यांची कामगिरी बघता त्यांना आदर्श पोलिस पाटील सेवारत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
यावेळी फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आला. हे घरपोच पोस्टाद्वारे येणार आहे. या सोहळ्यातच सर्व मानकऱ्यांना इ-मानपत्रे त्यांच्या व्हाट्सअपवर देण्यात आलीत.
राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. केशवजी महाराज सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांनी केलेल्या बीजभाषणात त्यांनी पुरस्कार मानकरी गुणवंतांनी पुरस्काराच्या प्रेरणेतून आपले भारतराष्ट्र अधिक शक्तिशाली आणि संपन्न बनविण्यासाठी आपले संपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन केले. दुर्जन शक्तीच्या वाढत्या प्रादुर्भावाला जर पराभूत करायचे असेल तर तुमच्यासारख्या गुणवंतांच्या सज्जन शक्तीचे संघटन देशात निर्माण व्हायला हवे; असेही प्रतिपादन त्यांनी केले.
तत्वचिंतक ह.भ.प श्यामसुंदर महाराज सोन्नर, ज्येष्ठ समाजसेवक अशोकानंद जवळगावकर, ज्येष्ठ साहित्यिक रमेश आव्हाड, ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर, आदर्श शिक्षिका मनीषा कदम, घार्गे आणि विनया जाधव, प्राचार्या रोशनी शिंदे, प्राचार्या कल्पिता पर्शराम, प्राचार्या प्रगती साळवेकर, सामाजिकनेत्या डॉ. शुभदा जोशी तसेच धडाडीच्या आयकर अधिकारी अरुणा परब यांनी या समारंभाला विशेष पाहुणे म्हणून ऑनलाईन उपस्थिती नोंदविली. त्यांनी व्हिडिओद्वारे आपले शुभसंदेश दिलेत.
विचारपीठावर शिवयोगी आणि प्रगतिशील शेतकरी उद्योजक पांडुरंग दादा मातेरे उपस्थित होते. या राज्यस्तरीय ऑनलाईन समारंभाचे अतिशय उत्तम व्यवस्थापन राजेंद्रदादा सरोदे यांनी पाहिले. या ऑनलाईन समारंभाचे सूत्रसंचालन गुणिजन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णाजी जगदाळे यांनी केले. यावेळी झालेल्या विविध गीतांच्या सादरीकरणात ऑनलाईन मानकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ये देश हैं वीर जवानो का या गाण्यावर उपस्थित सर्वांनी धरलेला नृत्याचा ठेका सर्वांनी टाळ्यांसह धरला.
या पूर्वीसुद्धा महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार 2012 व माहिती सेवा समिती (अ.भा.) महा अधिकार संरक्षण समितीकडून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सर्व स्तरांवरून संगीता आदेवार यांचावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.