बहुगुणी डेस्क, वणी: फिट येऊन रस्त्यावर पडलेल्या एका इसमाची दुचाकी लंपास केली. माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना मारेगाव (कोरंबी) पुलाजवळ घडली. मात्र 15 दिवसांनी लंपास झालेली दुचाकी जवळच असलेल्या दहेगाव येथे दिसून आली. त्यावरून दुचाकी ताब्यात असलेल्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी मारोती चिंधुजी सोळंकी (65) हे मजुरी करीत असून ते राजूर येथील मुळचे रहिवासी असून सध्या मारेगाव (कोरंबी) येथे राहतात. त्यांनी दीड वर्षाआधी पॅशन प्रो ही जुनी दुचाकी (MH34-AL-5129) विकत घेतली होती. त्यांना फिटचा त्रास आहे. 4 मार्च रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास ते मारेगाव येथून रासा या गावी कोळसा आणण्यासाठी गेले होते. दरम्यान कोरंबी येथील पुलाजवळ त्यांना अचानक फिट आली. ते मोटार सायकलसह खाली कोसळले. काही वेळ ते तिथेच पडून होते. मारेगाव येथील एका व्यक्तीला मारोती रस्त्यावर पडून दिसले. त्याने मारोतीला उठवले. तेव्हा त्यांना तिथे दुचाकी आढळून आली नाही.
मारोती हे परिसरात दुचाकीचा शोध घेत होते. दरम्यान शनिवारी दिनांक 22 मार्च रोजी दहेगाव येथील एका व्यक्तीचा फोन आला. त्यांनी मारोतीला त्यांची दुचाकी दहेगाव (घोन्सा) येथील एका तरुणाकडे असल्याची माहिती दिली. माहितीवरून मारोती हे मुलासह दहेगाव येथे गेले. तेव्हा त्यांना त्यांची दुचाकी झेडपी शाळेजवळ उभी दिसली. ते त्यांचीच दुचाकी आहे का याची खात्री करीत असताना तिथे अभिनव संजय बहादे (24) नावाचा एक तरुण आला. त्याने सदर दुचाकी 10 हजारात विकत घेतली, असे सांगत तो मारोती व त्याच्या मुलाशी वाद घालू लागला.
दुचाकीवरून वाद वाढताच तिथे गावातील पोलीस पाटील आले. त्यांनी सदर माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी आले. मारोती यांनी फिट येऊन पडल्यावर अभिनव हा दुचाकी घेऊन पसार झाला, असा आरोप करीत त्याच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी अभिनव विरोधात बीएनएसच्या कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.