लोडशेडिंग थांबविण्याची क्रांति संघटनेची मागणी

उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना निवेदन

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात बुधवार 13 एप्रिल पासून शहरी व ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेले वीज भारनियमन तात्काळ थांबविण्यात यावे. अशी मागणी क्रांति संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी उप विभागीय अधिकारी वणी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना निवेदन पाठविले आहे.

यंदा एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने मोठ्यांपासून लहानापर्यंत सर्वच हैराण झाले आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षेचा काळ सुरु असून मोबाइल, लॅपटॉपवर इंटरनेटच्या सहाय्याने विद्यार्थी अभ्यास करीत आहे. सध्या पवित्र रमजान महिना सुरु आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव उपाशी राहून रोजा ठेवत असतात. मात्र लोडशेडिंगच्या काळात कूलर, पंखा, एयर कंडिशनर बंद असल्यामुळे रोजेदारांना भयानक उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतात उभे पिकांनासूद्दा भारनियमनचा फटका बसत आहे. कोरोना काळात पूर्णपणे कोलमडलेले थंडपेय, आईसक्रीम सेंटर, झेरॉक्स दुकाने, इलेक्ट्रिक उपकरणे विक्री व्यवसाय यांनाही आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे. संपूर्ण राज्यात वीज निर्मिती केंद्राना वणी परिसरातील कोळसा खाणीतून कोळसा पुरवठा केल्या जातो. त्यामुळे वणी विभागाला लोडशेडिंग पासून वागळण्यात यावे. अशी मागणी क्रांति संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

निवेदन देताना क्रांति संघटनेचे एड. सुरज महारतळे, राकेश खुराणा, अविनाश भुजबळराव, राजू गव्हाणे, अभिजीत पथाडे, रोहण मुधोलकर, सूरज मडावी, राहुल ठावरी, आकाश जीवतोडे, सूरज चाटे, प्रवीण विरुटकर, कपिल जुनेजा, वैभव खडसे उपस्थित होते.

Comments are closed.